महापालिकेची सूट अन्‌ नागरिकांची लूट!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - मॉल, मल्टिप्लेक्‍स, महाविद्यालयांसह शहरातील विविध ठिकाणी सर्रास बेकायदा पार्किंग शुल्क वाहनधारकांकडून आकारणे सुरूच आहे. पंधरा ते चक्क पन्नास रुपयांपर्यंत हे शुल्क आकारले जात आहे. यात महापालिका प्रशासन या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. पार्किंगचालकांना सूट दिली जात असल्याचा वाहनधारकांचा आरोप आहे.

औरंगाबाद - मॉल, मल्टिप्लेक्‍स, महाविद्यालयांसह शहरातील विविध ठिकाणी सर्रास बेकायदा पार्किंग शुल्क वाहनधारकांकडून आकारणे सुरूच आहे. पंधरा ते चक्क पन्नास रुपयांपर्यंत हे शुल्क आकारले जात आहे. यात महापालिका प्रशासन या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. पार्किंगचालकांना सूट दिली जात असल्याचा वाहनधारकांचा आरोप आहे.

पार्किंग शुल्काच्या नावाखाली अनेक वर्षांपासून शहरात सर्रास लूट सुरू आहे. विशेषत: व्यापारी संकुल, मॉल, महत्त्वाची ठिकाणे, काही रुग्णालये व महाविद्यालयांतही वाहनधारकांकडून सक्तीने शुल्क वसुली केली जाते. या प्रकरणात मॉलविरुद्ध गुन्हा नोंद झाल्यानंतर औरंगाबादेतही आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी पार्किंग शुल्कविरोधात कारवाईला सुरवात केली. यात प्रोझोन मॉल व मोतीवाल ट्रेड सेंटरमध्ये पार्किंग शुल्क आकारणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. यानंतर शहरातील काही खासगी संस्था व संकुलांनी पार्किंग शुल्क आकारणे काही दिवस बंद ठेवले; परंतु त्यानंतर पुन्हा वसुली सुरू झाली. 

विशेषत: सिद्धार्थ उद्यानसाठीची पार्किंग एका संकुलात असून तेथे चोवीस तास पार्किंग शुल्क आकारण्यात येत होते. मुळात उद्यान बारा तासांपेक्षा अधिक काळ चालू राहत नसतानाही चोवीस तास पार्किंग शुल्क आकारले जात होते. पोलिसांच्या कारवाईनंतर आता २४ ऐवजी बारा तासांची पार्किंग सेवा देण्यात येत आहे.

करचुकवेगिरीचा उद्योग तेजीत
शहरातील पार्किंगचा उद्योग थाटणाऱ्यांवर महापालिकेतील काहींचा वरदहस्त असल्याचा आरोप होतो. त्यामुळेच आतापर्यंत हा उद्योग तेजीत सुरू होता. आतापर्यंतचा शासनाचा महसूल तर बुडलाच; परंतु ज्या संस्थांनी पार्किंग शुल्क आकारले त्यांच्या हिशेबाचा ताळेबंदही ठेवला नसल्याचे समोर आले आहे. त्यामूळे करचुकवेगिरी झाल्याची बाब सूत्रांनी व्यक्त केली.

शुल्क वसूल करता येत नाही 
मॉलसह मल्टिप्लेक्‍समध्ये येणाऱ्या ग्राहकांना नि:शुल्क पार्किंग सेवा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे; पण सर्रास शुल्क वसुली होते. मल्टिप्लेक्‍समधील पार्किंगची जागा ही कॉमन स्पेस आहे. यामुळे त्या जागेवर वाहन ठेवण्यासाठी तिथे येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे वसुली करता येत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पार्किंग एजन्सीला मागितला ताळेबंद
प्रोझोन मॉलमध्ये दररोज किमान सोळाशेच्या आसपास वाहने येतात. यात नऊशेपेक्षा अधिक दुचाकींचा समावेश आहे. सोमवार ते गुरुवार पार्किंग शुल्क वेगळे व शुक्रवार ते रविवारदरम्यान पार्किंग शुल्क वाढीव असते. दिवसाकाठी आलेल्या वाहनांची संख्या, प्रकार व शुल्क वसुली याचा ताळेबंदच आर्थिक गुन्हे शाखेने प्रोझोन मॉलमधील पार्किंग एजन्सीला मागितला आहे.

Web Title: aurangabad marathwada news municiapl concession public loot