विकासकामांची ‘बजेट कोंडी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

औरंगाबाद - आर्थिक वर्ष संपल्यानंतर मंजूर झालेले महापालिकेचे वार्षिक बजेट सर्वसाधारण सभेने अंतिम करेपर्यंत एप्रिल उजाडला होता. आता जून महिना संपण्याला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीही अद्याप बजेट बुकची छपाई झालेली नाही. त्यामुळे लेखा विभागाकडून एकाही नवीन कामासाठी आर्थिक तरतूद केली जात नाही, परिणामी नवीन कामे अजून सुरू झालेली नाहीत. यासाठी बुधवारी (ता. २१) स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी आढावा घेतला. 

स्थायी समितीने मंजूर केलेल्या ९० टक्‍के बजेटमध्ये बदल होत नाही, यामुळे त्या तरतुदी गृहीत धरून नवीन कामे सुरू करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 

स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी बुधवारी (ता. २१) त्यांच्या दालनात बैठक घेतली. नगरसेवक नंदकुमार घोडेले, मुख्य लेखाधिकारी रा. मा. सोळुंके, प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सरताजसिंग चहल, अफसर सिद्दीकी यांच्यासह सर्व उपअभियंते, वॉर्ड अभियंते उपस्थित होते. भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना, रस्त्यांची कामे, विद्युत विभाग, नालेसफाई, प्रगतिपथावरील कामांचा आढावा घेतला. सभापती श्री. बारवाल यांनी सांगितले, की कमी मनुष्यबळ असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे कनिष्ठ अभियंता, सबओवरसियर, क्‍लार्क ही पदे कंत्राटी पद्धतीने भरून कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. भूमिगत गटार योजनेमुळे रस्त्यांची कामे सध्या करणे शक्‍य नसल्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे संबंधितांना भूमिगत योजनेची कामे महिनाभरात पूर्ण करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. पावसात रस्ते खराब झाले असून, त्या रस्त्यांवर नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून मुरूम टाकण्याला परवानगी देण्याचे सांगितले आहे, अशी माहिती बारवाल यांनी दिली.

सातारा-देवळाईत करा आठ कोटींचे रस्ते
सातारा-देवळाईसाठीचे आठ कोटी रुपये सिडकोकडे आहेत. हा भाग महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याने हे आठ कोटी आता महापालिकेला मिळणे अपेक्षित असल्याचे सांगून बारवाल यांनी अधिकाऱ्यांनी हा निधी मिळावा, यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करण्याचे व हा पूर्ण निधी सातारा-देवळाईत रस्ते करण्यासाठी वापरण्याचे आदेश दिले.

Web Title: aurangabad marathwada news municipal budget