आम्ही हॉस्पिटलला गेल्यावर जायभायेने काय केले माहीत नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

औरंगाबाद - संकेत जायभायेने कारचा रिव्हर्स घेतल्याने पहिला धक्का आम्हालाच लागला. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो; त्यामुळे पुढे काय झाले, त्याने कुणाला चिरडले हे माहीत नव्हते, अशी माहिती अटक केलेल्या संशयितांनी मुकुंदवाडी पोलिसांना दिली.

औरंगाबाद - संकेत जायभायेने कारचा रिव्हर्स घेतल्याने पहिला धक्का आम्हालाच लागला. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो; त्यामुळे पुढे काय झाले, त्याने कुणाला चिरडले हे माहीत नव्हते, अशी माहिती अटक केलेल्या संशयितांनी मुकुंदवाडी पोलिसांना दिली.

संशयितांनी सांगितल्यानुसार पोलिसांनी माहिती दिली, की संकेत मचे आणि उमर अफसर शेख हे दोघे २३ मार्चला शैक्षणिक मोर्चात सहभागी झाले होते. तर विजय जौक याचे जिल्हा सत्र न्यायालयात काम असल्याने तो तिकडे गेला होता. काम आटोपून तो क्रांती चौकात आला, त्यावेळी त्याला संकेत मचे आणि उमर भेटले. त्यानंतर उमर आणि संकेत मचे एका मित्राच्या स्कुटीवरून देवळाई येथे जाण्यासाठी निघाले, तेव्हा संकेत जायभाये त्यांना भेटला. स्कुटीवरून जाण्याऐवजी आपल्या कारमध्ये बसा, देवळाईला सोडतो असे तो त्यांना म्हणाला. त्यामुळे ते कारमध्ये बसले. त्यानंतर ते कामगार चौकात आले.

दरम्यान संकेत जायभायेला एक कॉल आला. त्यामुळे तो कामगार चौकात थांबला; परंतु त्याच्या मित्रांनी आम्हाला जयभवानी चौकापर्यंत सोड अशी विनंती केली. याच वेळेत पुन्हा एक कॉल संकेत जायभायेला आला व कामगार चौकात भेट, असे त्याला सांगण्यात आले, त्यामुळे तिन्ही संशयित वाहनांच्या खाली उतरले. दरम्यान, संकेत कुलकर्णी मित्रांसह चौकात आला. त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर संकेत जायभायेने कार रिव्हर्स घेतली, यात विजय जौक याच्या पायाला इजा झाली म्हणून तिथून ते लगेच हॉस्पिटलला निघून गेले. पुढे काय झाले, माहीत नाही, असा दावा मंगळवारी अटक केलेल्या संशयितांनी केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

फ्रॅक्‍चरचा बनाव!
विजय जौक याच्या पायाला संकेत जायभायेच्या कारचा धक्का लागला. पाय फ्रॅक्‍चर झाला म्हणून हॉस्पिटलला जाऊन पट्टी बांधली असे त्याने पोलिसांना सांगितले. परंतु, पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता पायाला केवळ मुका मार लागला, भासवण्यासाठी त्याने पायाला पट्टी बांधल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिसरा संशयित अटकेत
औरंगाबाद  - संकेत कुलकर्णी खून प्रकरणात मारेकऱ्याच्या दोन साथीदारांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी (ता. तीन) मध्यरात्री तिसऱ्या संशयितालाही पाथर्डी परिसरातून अटक केली. संकेत मचे असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तत्पूर्वी उमर अफसर शेख (वय १९,  रा. कौसर पार्क, देवळाई) व विजय नारायण जौक (वय : २२, बाळापूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. विजय, उमरसह संकेत मचेविरुद्ध खून प्रकरणात कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. सिडको एन-दोन परिसरात प्रेमप्रकरणावरून कुलकर्णीचा कारखाली चिरडून खून करण्यात आला. यात कुलकर्णी याचे दोन मित्र जखमी झाले. दरम्यान, जायभाये याला अटक झाली. संकेत मचे पसार होता. पटेल याला शहरातून, तर जौक याला पैठण येथून ताब्यात घेण्यात आले होते.

Web Title: aurangabad marathwada news murder case crime