नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग - वैजापूर-गंगापुरातील काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

दरनिश्‍चितीचा अकरा गावांत खोळंबा

औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी घेतल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील जमिनींच्या दरनिश्‍चितीचे घोडे ११ गावांमध्ये अडले आहे. गंगापूर, वैजापूर येथील दरांबाबत निर्णय झाला असून औरंगाबाद शहरालगत असलेल्या गावांमधील जमिनींचा दर निश्‍चितीचे काम शासकीय यंत्रणांना अद्याप पुढे रेटता आलेले नाही.

दरनिश्‍चितीचा अकरा गावांत खोळंबा

औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी घेतल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील जमिनींच्या दरनिश्‍चितीचे घोडे ११ गावांमध्ये अडले आहे. गंगापूर, वैजापूर येथील दरांबाबत निर्णय झाला असून औरंगाबाद शहरालगत असलेल्या गावांमधील जमिनींचा दर निश्‍चितीचे काम शासकीय यंत्रणांना अद्याप पुढे रेटता आलेले नाही.

नागपूर ते मुंबईदरम्यानचा प्रवास वेगवान होण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘समृद्धी’ महामार्गाच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी यासाठीच्या जमिनींचा दर निश्‍चित करण्याचे काम अद्याप संपलेले नाही. शेजारील जालना जिल्ह्यातील गावांसाठीचे दर जाहीर झाले असले तरी औरंगाबादेत मात्र अद्याप असे चित्र नाही. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि औरंगाबाद तालुक्‍यांच्या ६२ गावांमधून ११२.३० किलोमीटरचा महामार्ग जाणार आहे. यापैकी औरंगाबाद तालुका ३६, वैजापूर १५ आणि गंगापुरातील ११ गावांतून हा महामार्ग प्रस्तावित आहे. यापैकी ११ गावांमध्ये शेतकऱ्यांकडून जमिनी घेण्याचे दर निश्‍चित करण्यात अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही. 

गंगापूर आणि वैजापूर भागातील दर हा औरंगाबाद शहरालगतच्या गावांच्या तुलनेने कमी असला तरी तेथील खरेदी-विक्रीचे व्यवहार स्थिर आहेत. तेथील खरेदी आणि विक्रीत सातत्य असल्याने या दोन तालुक्‍यांमधील दर निश्‍चित करता आले आहेत. औरंगाबाद तालुक्‍यातील गावांमधील व्यवहार आणि किमती पाहता येथील दर अद्याप ठरवण्यात आलेले नाहीत. दरम्यान, समृद्धी महामार्गाला विरोध करण्यात पुढे असलेल्या गावांमध्ये आंदोलनांची ठिणगी पडली आहे. या गावांमध्येच सध्या हा पेच उभा राहिला आहे. दर ठरवण्यात आडकाठी नसलेल्या ठिकाणांच्या जमिनी घेताना अडीच ते पाचपट मोबदला मिळण्याची चिन्हे आहेत.

गावातच कळणार दर
समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या जमिनींच्या दरांची माहितीही गावनिहाय देण्यात येणार आहे. एकत्रित यादी प्रसिद्ध न करता ती गावांशी संपर्क साधण्यासाठी नेमण्यात आलेल्या जबाबदार व्यक्तीच्या माध्यमातून ग्रामस्थांना सांगण्यात येणार आहे. हे काम आठ ते दहा दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: aurangabad marathwada news nagpur-mumbai samruddhi highway