आरटीओसमोर नवीन आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

रिक्षा परवान्याचे जमा फॉर्म वाटणार कसे अन्‌ भरून घ्यावे कसे?

औरंगाबाद - राज्य शासनाने रिक्षा परवाने (परमिट) खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरटीओ कार्यालयाकडे जवळपास दीड हजार अर्ज आलेत. या सर्व अर्जांची छाननी करून ठेवली असतानाच नव्याने ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचा नवा फतवा परिवहन विभागाकडून आला असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. प्रत्येक उमेदवाराला शोधून त्याचा अर्ज देणे आणि पुन्हा नवीन भरून घेण्याचे नवीन आव्हान आरटीओ कार्यालयापुढे आहे. ही प्रक्रिया पार पाडताना रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

राज्यातील मुंबईतील टॅक्‍सी आणि ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक व औरंगाबाद येथील रिक्षांच्या परमिटवर गेल्या वीस वर्षापासून बंदी होती. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या परमिटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू होता. पाच वर्षांसाठी ठराविक रक्कम घेऊन परमिट अन्य रिक्षाचालकांना भाड्याने दिले जात होते. नवीन व्यवसाय करणाऱ्यांना रिक्षा परमिट भाड्याने घ्यावे लागत होते. परमिट भाड्याचे व रिक्षाही भाड्याची, अशी अवस्था असलेल्या रिक्षाचालकांना व्यवसाय करताना आर्थिक ओढाताण सहन करावी लागत होती. शासनाने १७ जूनला परमिट खुले करण्याचा निर्णय घेतला; मात्र अर्ज नेमके कसे स्वीकारावेत हे निश्‍चित नव्हते. याबद्दल संभ्रमावस्था असताना कार्यालयात रोज परमिटसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन कार्यालयाने ऑफलाइन अर्ज स्वीकारले. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात दीड हजाराच्या जवळपास आरटीओ कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाले. असे असतानाच परिवहन विभागाने ऑनलाइन प्रक्रिया करण्याचे आदेश दिले.

त्यामुळे रिक्षाचालकांना आता पूर्वी कार्यालयात दिलेले अर्ज ताब्यात घेऊन ऑनलाइन पद्धतीने भरून द्यावे लागणार आहेत. अर्ज दिलेल्या प्रत्येकाला त्याचा अर्ज शोधून परत करण्याचे मोठे आव्हान आरटीओ अधिकाऱ्यांसमोर आहे. यासाठी एक कर्मचारी नियुक्त केला, तरीही दीड हजार अर्ज शोधून योग्य व्यक्तीचा अर्ज बाहेर काढण्याचे जिकिरीचे आणि वेळखाऊ काम मोठ्या प्रमाणावर वादविवाद आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण करणारे आहे. 

रिक्षा परमिटसाठी सुरवातीला कार्यालयात अर्ज मागवण्यात आले. आता जर पुन्हा ऑनलाइन भरून देण्याची गरज असेल तर आरटीओने कार्यालयामार्फत हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले पाहिजेत. रिक्षाचालकांनी अर्ज ताब्यात घेऊन पुन्हा जमा करणे प्रत्येकाला शक्‍य होणार नाही.  
- निसार अहेमद, रिक्षाचालक संयुक्त कृती समिती 

Web Title: aurangabad marathwada news new challenge for rto