खासगीकरणाचा नवा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

औरंगाबाद - वेगवेगळ्या माध्यमातून शहरावर खासगीकरणाचे अयशस्वी प्रयोग होत आले आहेत. आता महापालिका प्रशासनाने महसुली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने बंद पडलेल्या; तसेच कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात बंद पडलेल्या पाच शाळा भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत; तसेच पालिकेच्या सर्वच शाळांच्या इमारती सायंकाळच्या सत्रात कोचिंग क्‍लासेस व्यावसायिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

यासंबंधीचे धोरण निश्‍चित करण्यासाठीचा प्रस्ताव मंगळवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरियांना पालिकेच्या बंद पडलेल्या आणि कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा खासगी शिक्षणसंस्थांना देण्याची कल्पना सुचली. यातून पालिकेला आर्थिक उत्पन्नही मिळेल आणि पालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षणही मिळेल, या हेतूने त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी यासंबंधीचा प्रस्तावही त्या वेळी तयार केला होता.

काही कारणास्तव तो त्या वेळी सभेसमोर आणला गेला नव्हता. यातच बकोरिया यांची बदली झाली. मात्र, आता हा प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी येत आहे, तोही तत्कालीन आयुक्त बकोरियांच्याच स्वाक्षरीने. या प्रस्तावात बंद पडलेल्या पाच शाळा भाडेतत्त्वावर खासगी संस्थांना देण्याचे नमूद केले आहे. बंद पडलेल्या या शाळा शालेय वापरासाठी शैक्षणिक संस्थेस भाडेतत्त्वावर देण्यासाठीचे धोरण ठरविण्यासाठी हा प्रस्ताव सभेसमोर आणला गेला आहे. हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे माहीत असल्यामुळेच स्थायी समिती सभापती बारवाल यांनी सभापतिपदाची सूत्रे हाती घेताच याविषयीचे संकेत दिले होते.

खासगी शिकवणी वर्गही भरणार
शाळेला सुटी झाल्यानंतर पालिका शाळांच्या इमारतीत कोणतेही उपक्रम होत नाहीत. त्यामुळे सायंकाळच्या सत्रात पालिका शाळांच्या इमारती या शहरातील खासगी कोचिंग क्‍लासेस; तसेच संगणक, कराटे, संगीत व डान्स क्‍लासेस व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचेही प्रस्तावात नमूद केले आहे. विशेष म्हणजे संबंधित क्‍लासेस व्यावसायिकांना यात पालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची अट घालण्यात आली आहे. यामुळे पालिकेला आर्थिक उत्पन्न तर मिळणारच आहे. शिवाय पालिका विद्यार्थ्यांना क्‍लासेसच्या माध्यमातून संगीत, कराटे, संगणक व डान्सचे शिक्षणही मिळणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news New Expertise of Privateization