एक कोटीची बिले थकली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

औरंगाबाद - महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागाला विविध सेवा देणाऱ्या एजन्सींची सुमारे एक कोटी रुपयांची बिले थकल्याने देखभाल दुरुस्तीअभावी महापालिकेच्या वाहनांचा खडखडाट सुरू झाला आहे. याची दखल घेऊन स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी गुरुवारी (ता.२२) थकीत बिलांपैकी काही रक्‍कम का होईना देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. 

औरंगाबाद - महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागाला विविध सेवा देणाऱ्या एजन्सींची सुमारे एक कोटी रुपयांची बिले थकल्याने देखभाल दुरुस्तीअभावी महापालिकेच्या वाहनांचा खडखडाट सुरू झाला आहे. याची दखल घेऊन स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी गुरुवारी (ता.२२) थकीत बिलांपैकी काही रक्‍कम का होईना देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. 

महानगरपालिकेकडे सुमारे पावणेतीनशे वाहने आहेत. यांत्रिकी विभागाच्या कार्यकक्षेत ही वाहने चालतात. या वाहनांच्या दैनंदिन देखभाल, दुरुस्तीसाठी यांत्रिकी विभागाने एजन्सींची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनांची दुरुस्ती, त्यांचे स्पेअर पार्ट बदलणे आदी कामे या एजन्सींकडून केली जातात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने या एजन्सींची बिले दिली नाहीत. यामुळे वाट पाहून कंटाळलेल्या एजन्सींनी एकत्रितपणे आठवडाभरापूर्वीच आयुक्तांना लेखी पत्र देऊन तातडीने बिले अदा करावीत, अन्यथा सेवा थांबविण्यात येतील, असा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या एजन्सींनी महापालिकेला सेवा देणे थांबविले आहे. यामध्ये न्यू साधना इंजिनिअरिंग, मारुती टायर्स, मारुती केअर्स, एस. एम. गॅरेज, परमार ऑटो गॅरेज, गजानन इंजिनिअरिंग, चाणक्‍य ऑटो इलेक्‍ट्रिकल्स आणि जैन ट्रेडर्स या एजन्सींचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी गुरुवारी तातडीने अधिकाऱ्यांना बोलावून या ठेकेदार एजन्सींची बिले अदा करण्याच्या सूचना केल्या. सर्व बिल एकदाच देणे शक्‍य नसेल तर थोडी थोडी रक्कम देण्याच्या सूचना केल्याचे श्री. बारवाल यांनी सांगितले.

थकीत बिले
पुरवठादार एजन्सी :         आठ
थकीत बिले :             एक कोटी सहा लाख 
न्यू साधना इंजिनिअरिंग  :         ३० लाख रुपये 
जैन ट्रेडर्स :             १९ लाख 
एस. एम. गॅरेज :         १५ लाख
गजानन इंजिनिअरिंग :         १३ लाख
मारुती केअर्स :             आठ लाख
मारुती टायर :             सहा लाख

Web Title: aurangabad marathwada news one crore bill arrears