रिक्षा परवान्यासाठी आता ऑनलाईन अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

औरंगाबाद - राज्य शासनाने रिक्षा परवाने (परमिट) खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरटीओ कार्यालयाने अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. आरटीओ कार्यालयात जवळपास एक हजार अर्ज आले असताना आता पूर्वी भरलेले अर्ज पुन्हा तुमच्या ताब्यात घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने परत भरून द्या असा नवा फतवा आरटीओ कार्यालयाने काढला. त्यामुळे रिक्षाचालकांना पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

औरंगाबाद - राज्य शासनाने रिक्षा परवाने (परमिट) खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरटीओ कार्यालयाने अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. आरटीओ कार्यालयात जवळपास एक हजार अर्ज आले असताना आता पूर्वी भरलेले अर्ज पुन्हा तुमच्या ताब्यात घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने परत भरून द्या असा नवा फतवा आरटीओ कार्यालयाने काढला. त्यामुळे रिक्षाचालकांना पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

केंद्राच्या आदेशानुसार १३ नोव्हेंबर १९९७ पासून राज्यातील मुंबईतील टॅक्‍सी आणि ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक व औरंगाबाद येथील रिक्षांच्या परमिटवर बंदी होती. दरम्यानच्या काळात रिक्षांचे नवीन परमिट बंद असल्याने अस्तित्वात असलेल्या परमिटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू होता. पाच वर्षांसाठी साठ ते सत्तर हजार रुपये रक्कम घेऊन रिक्षा परमिट अन्य रिक्षाचालकांना दिले जात होते. नवीन व्यवसाय करणाऱ्यांना रिक्षा परमिट भाड्याने घ्यावे लागत होते. परमिट भाड्याचे व रिक्षाही भाड्याची, अशी अवस्था असलेल्या रिक्षाचालकांना व्यवसाय करताना आर्थिक ओढाताण सहन करावी लागत होती. त्यानंतर शासनाने १७ जूनला परमिट खुले करण्याचा निर्णय घेतला; मात्र अर्ज नेमके कसे स्वीकारावे हे निश्‍चित केलेले नव्हते. याबद्दल संभ्रमावस्था असताना कार्यालयात रोज परमिटसाठी मोठी गर्दी होत असल्याने कार्यालयाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरवात केली. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात हजारावर अर्ज आरटीओ कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. रिक्षा परमिट मिळेल या अपेक्षेवर असलेल्या रिक्षाचालकांचा भ्रमनिरास झाला. आता नव्याने परिवहन विभागाकडून आलेल्या सूचनांनुसार परमिटसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णय बदलल्याने पूर्वी कार्यालयात अर्ज जमा केलेल्या रिक्षाचालकांनी ते अर्ज पुन्हा ताब्यात घेऊन ऑनलाइन पद्धतीने भरून देणे आवश्‍यक आहे. यासाठी पाचशे रुपये अर्ज शुल्क ठरवण्यात आले आहे. रिक्षाचा ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांना अपॉईंटमेंन्ट घ्यावी लागणार आहे. अपॉईंटमेंटच्या दिवशी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्या रिक्षाचालकांना इरादा पत्र देण्यात येणार आहे. 
 

पूर्वी भरलेले अर्ज ताब्यात घ्या अन्‌ नव्याने भरून द्या  
आरटीओ कार्यालयाचा नवा फतवा 

नवीन परवान्यासाठी रिक्षाचालकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आरटीओ कार्यालयाने अर्ज स्वीकारून कागदपत्रांची छाननी करून ठेवली आहे. आता अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने देण्याचे काम शिल्लक आहे. पूर्वी अर्ज घेतल्याने रिक्षाचालकांचा कागदपत्र जुळवाजुळव करण्याचा त्रास कमी झाला आहे. 
- अमर पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: aurangabad marathwada news online form for rickshaw permit