मकबऱ्यात सरकारी नव्हे, सावकारी वसुली!

मकबऱ्यात सरकारी नव्हे, सावकारी वसुली!

वाहनतळावर नियमांचे उल्लंघन - शुल्क २० रुपये, वसुली मात्र ५०, ८० रुपयांची 

औरंगाबाद - पार्किंगच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या अवाच्या सव्वा वसुलीच्या फेऱ्यातून भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील बिबी-का-मकबराही सुटलेला नाही. निविदेत वसुलीसाठी ठरवून देण्यात आलेल्या रकमेपेक्षा पार्किंग चालवणारा ठेकेदार चक्क तीन ते चारपट अधिक रक्कम वसूल करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

बिबी-का-मकबरा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पार्किंगसाठी नेमण्यात आलेल्यांकडून सावकारी लूट सुरू आहे. निविदेत कोणत्या प्रकारच्या वाहनाकडून पार्किंगपोटी किती रक्‍कम घ्यावी, हे स्पष्ट करण्यात आले आहे. 
यामध्ये सायकलसाठी २ रुपये, दुचाकीसाठी ५ रुपये, कार अथवा रिक्षांसाठी १० रुपये, तर जड वाहनांकडून २० रुपयांचे शुल्क घेण्यात यावे, असे नमूद आहे. असे असताना सध्या येथे कंत्राटदार सायकलसाठी ५, दुचाकीसाठी १०, चारचाकींकडून ३० किंवा ५०, तर जड वाहनांकडून पार्किंगपोटी ८० रुपयांची जबर लूट करीत असल्याचे चित्र आहे. 

पार्किंगपोटी देण्यात येणाऱ्या पावत्या वेगवेगळ्या पद्धतीने छापण्यात आल्या आहेत. यातील काही पावत्यांवर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नावाचा उल्लेख आहे, तर वाढीव दराच्या पावत्यांवर असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. याशिवाय या पावत्यांवर वाहनांच्या प्रकाराचा कोणाताही उल्लेख न करता बसवाल्यांना २० ऐवजी थेट ८० रुपयांची बोगस पावती देण्यात येते. विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या गाड्यांना अशा नियमबाह्य पावत्या देण्यात येतात.  

नव्यानेच मी या कार्यालयात रुजू झालो आहे. या विषयाची कर्मचाऱ्यांकडून पडताळणी करण्यात येईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.  
- डॉ. के. डी. खमारी. अधीक्षक, पुरातत्त्व विभाग

नियमांची सर्रास पायमल्ली 
पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या गाड्यांच्या होणाऱ्या नुकसानीला पार्किंग चालविणारा कंत्राटदार जबाबदार असल्याचे निविदेत स्पष्ट केले आहे; पण पावत्यांवर यासाठी वाहनचालक जबाबदार असल्याचे स्पष्ट लिहिण्यात येते. पार्किंगचे दर, वास्तू खुली असण्याच्या वेळांचे फलक ठळक ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आजपर्यंत कोणत्याही पार्किंग कंत्राटदाराने हे केलेले नाही. तर पुरातत्त्व विभागही याकडे डोळेझाक करतो. याशिवाय प्रसंगी काही कोऱ्या पावत्यांवरही पार्किंगचे शुल्क हाताने लिहून देण्यात येते.

कोणाच्या आशीर्वादाने लूट सुरू? 
बिबी-का मकबऱ्यात पार्किंगपोटी सुरू असलेल्या लूट प्रकरणात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात तक्रार देण्यात आली होती. त्यावर कोणतीही ठोस कारवाई न करता या प्रकाराला खत-पाणी घालण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी आणि आताच्या ठेकेदाराला कोणीही ‘बोलण्याचा’ धोका पत्करत नाही. शिवाय बेगमपुरा पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही पावलांवर ही बेलगाम वसुली सुरू असल्याने पर्यटकही आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com