पोलिस पेट्रोलपंपासह शहरातील दोन पंपांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

औरंगाबाद - गत महिन्यात पेट्रोलपंप तपासणी मोहीम झाल्यानंतर पुन्हा शहरात सोमवारी (ता. २४) पोलिस विभागाच्या पेट्रोलपंपासह बीड बायपास रस्त्यावरील रामकृष्ण पंपाची तपासणी झाली. गुन्हे शाखा पोलिस आणि वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली. यात पंपात दोष नसल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

औरंगाबाद - गत महिन्यात पेट्रोलपंप तपासणी मोहीम झाल्यानंतर पुन्हा शहरात सोमवारी (ता. २४) पोलिस विभागाच्या पेट्रोलपंपासह बीड बायपास रस्त्यावरील रामकृष्ण पंपाची तपासणी झाली. गुन्हे शाखा पोलिस आणि वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली. यात पंपात दोष नसल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

उत्तर प्रदेश, राजस्थानसह ठाणे शहरातील पंपावर चीप बसवून इंधनचोरीचे प्रकार उघड झाले होते. यानंतर ठाणे गुन्हे शाखा व वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील चार पेट्रोलपंपांची तपासणी केली. यात जालना रस्त्यावरील चुन्नीलाल पेट्रोल पंप, भवानी पेट्रोल पंप, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील पंप तसेच गारखेडा भागातील एस्सार कंपनीच्या पंपाची तपासणी झाली होती. त्यापैकी तीन पंपांच्या डिस्पेंजर मशिनमधून पेट्रोल कमी येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या पंपावर पथकाने सील ठोकत कारवाई केली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी गुन्हे शाखेच्या पथकाला शहरातील पंपांची तपासणी करण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानंतर वैधमापन व अन्य अधिकाऱ्यांसोबत पथकाने टीव्ही सेंटर परिसरातील पोलिस कल्याण विभागाच्या पेट्रोलपंपाची तपासणी सुरू केली. यानंतर पंपाचा ताबा घेत वैधमापन व पोलिस पथकाने पंपावरील सर्व डिस्पेंजर मशिनची तपासणी केली. यात अधिकाऱ्यांनी पाच लिटरच्या मापात पेट्रोल काढून त्यात कमी येणाऱ्या पेट्रोलची पाहणी केली. सुमारे दोन ते तीन तास तपासणी सुरू होती.

यानंतर सायंकाळी पथकांनी बीड बायपास रोडवरील श्री रामकृष्णा पंपावर तपासणी सुरू केली. या पंपावरील डिस्पेंजर १२ युनिटपैकी ७ युनिट बंद असल्याचे पंपावरील कर्मचाऱ्यांनी पथकाला सांगितले. त्यानंतर पथकाने पंपाची तपासणी केली असता, ५ डिस्पेंजर मशिनमधून ५ ते १५ मिलिलिटर पेट्रोल कमी येत असल्याचे आढळले. यानंतर पथकाने बंद डिस्पेंजर मशिन तपासल्या पण त्या नादुरुस्त असल्याने मशिन बंद ठेवण्याचे सांगत दुरुस्तीसाठी तक्रार नोंदविण्याची सूचना इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांनी पंपचालकाला केली. ही कार्यवाही सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अनिल वाघ, इंडियन ऑईलच्या अपेक्षा भदोरिया, हिंदुस्थान पेट्रोलियमचे विपुल शर्मा, भारत पेट्रोलियमचे विकास रंजन पांडे, वैधमापन विभागाचे निरीक्षक सी. ए. मुंडे, अ. सु. कुलकर्णी, सहायक निरीक्षक डी. के. तांदळे आदींनी केली.

नोजल बंद 
रामकृष्ण पंपावर काही नोजल बंद असून, उर्वरित नोजलची संयुक्त तपासणी करण्यात आली. यात ५ लिटर पेट्रोलमागे ५ ते १५ मिलिलिटरचा फरक ‘श्री’ या पंपावर आला. परंतु, हा अत्यल्प असून, आणखी काही पंपांची नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त रामेश्‍वर थोरात यांनी सांगितले.

अहवाल अद्याप नाही
गत महिन्यात शहरातील पंपांची गुन्हे शाखेच्या पथकाने व त्यानंतर ठाणे येथील पथकाने तपासणी केली. यात शहरातील तीन पंप सील केले गेले. या पंपांच्या डिस्पेंजर मशिनमध्ये सापडलेल्या इलेक्‍ट्रिक चीप तपासणीचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad marathwada news police with petrol pump cheaking