‘वंदे मातरम्‌’च्या आडून राजकीय डाव!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

अडीच वर्षे ‘मान’ राखणाऱ्या ‘एमआयएम’चा अचानक विरोध कशासाठी?
औरंगाबाद - ‘वंदे मातरम्‌’वरून महापालिकेत शिवसेना-भाजप, एमआयएम नगरसेवकांमध्ये शनिवारी (ता. १९) झालेला राडा राजकीय स्टंटबाजी असल्याची जोरदार चर्चा महापालिकेत सुरू आहे. अडीच वर्षे ‘वंदे मातरम्‌’चा ‘मान’ राखणाऱ्या एमआयएमचा अचानक विरोध कशासाठी? या खेळीमागे नेमके कोण आहे? निलंबित अधिकाऱ्यांना कामावर घेतल्याच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी तर ही खेळी खेळली नाही ना? अशा प्रश्‍नांवर तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

महापालिकेचे तीन निलंबित अधिकारी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. १८) रुजू झाले आहेत. शासनाच्या आदेशाचा हवाला देत आयुक्तांनी हे आदेश काढले; मात्र त्यांच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी शंका घेतली होती. या प्रकरणावर सर्वसाधारण सभेत आवाज उठवू, असा इशारा या वेळी देण्यात आला होता; मात्र सभेला सुरवात होताच एमआयएमच्या नगरसेवकांनी ‘वंदे मातरम्‌’चा विषय उकरून काढला व त्यानंतर चार तासांचा ‘ड्रामा’ संपूर्ण राज्याने अनुभवला. एमआयएमची महापालिकेत एंट्री होऊन अडीच वर्षे होत आहेत. केरळ उच्च न्यायालयाच्या ‘वंदे मातरम्‌’संदर्भातील निर्णयावर एमआयएमने विरोध दर्शविला; मात्र त्यानंतर एक सर्वसाधारण सभा झाली, स्थायी समितीच्या दोन बैठका झाल्या.

प्रत्येक वेळी ‘वंदे मातरम्‌’चा मान राखणारे नगरसेवक आज नेमके खाली का बसले? याची जोरदार चर्चा महापालिकेत सभा संपल्यानंतर सुरू झाली. अनेकांनी निलंबित अधिकाऱ्यांच्या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा ‘राजकीय डाव’ असल्याचा तर्क काढला. 

महापालिकेत एखाद्या विषय मॅनेज करण्यासाठी पक्षविरहित असलेली ‘अभद्र युती’ सर्वश्रुत आहे, त्याचाच हा एक भाग असल्याचे काहींचे म्हणणे आहे. एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारायच्या व ‘मालदार’ विषयांवर अशी भावनिक हाक देत नागरिकांची दिशाभूल करायची यात महापालिकेतील सत्ताधारी कसे माहिर आहेत, त्याचा पुन्हा एकदा शहरवासीयांना मात्र प्रत्यय आला. 

कळस युतीचा
‘एमआयएम’चा ‘वंदे मातरम्‌’ला विरोध नाही किंवा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. निलंबित भ्रष्ट अधिकाऱ्यांना परत सेवेत घेतल्याने ही सर्वसाधारण सभा होऊ द्यायची नाही, हे पूर्वनियोजित होते; परंतु हे आम्ही होऊ देणार नाही. आज अचानक असे काय झाले, याची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केल्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले; मात्र सभेच्या सुरवातीलाच एमआयएमच्या नगरसेविकेनेच हा विषय छेडला. त्यानंतर वंदे मातरम्‌ सुरू असताना उभे न राहता अवमान करणाऱ्यांमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाचा समावेश होता. या ड्राम्याची सुरवात एमआयएमने केली व कळस मात्र शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेवकांनी चढविला.

Web Title: aurangabad marathwada news political planning on vande mataram