शिवसेनेपुढे झुकली भाजप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

रस्त्यांच्या निधीचे राजकारण; महापौरांनी केले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे अभिनंदन 

औरंगाबाद - शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी आणल्याच्या श्रेयाच्या राजकारणात शिवसेनेपुढे अखेर भाजप झुकली.

रस्त्यांच्या निधीचे राजकारण; महापौरांनी केले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे अभिनंदन 

औरंगाबाद - शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी आणल्याच्या श्रेयाच्या राजकारणात शिवसेनेपुढे अखेर भाजप झुकली.

गुरुवारी (ता. २०) झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर भगवान घडामोडे यांनी रस्त्यांसाठी निधी आणण्यात सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे, असे स्पष्ट करत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला. तत्पूर्वी, त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना चहापानासाठी निमंत्रण दिले होते. दरम्यान, सभागृहात ‘सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय... नाय काय...’ या गाण्याने सदस्यांचे मनोरंजन केले. 

शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने गेल्या महिन्यात शंभर कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या निधीच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला विश्‍वासात न घेता निधीची घोषणा केली. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप गटनेते प्रमोद राठोड यांनी हा निधी आणण्यात महापौर भगवान घडामोडे यांचेच मोठे योगदान असून प्रथमच एवढा मोठा निधी शहराला मिळाला. ज्यांना आपल्या वॉर्डात रस्ते करायचे आहेत, त्यांनी महापौरांचा सत्कार करण्यासाठी डायसवर यावे, असे आवाहन केले. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेत समांतर पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजनेसाठी आलेल्या निधीची आठवण भाजपला करून दिली होती. या निधीसाठी पालकमंत्र्यांसह, आमदार, खासदारांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. असे असताना भाजप पदाधिकाऱ्यांची श्रेय घेण्याची भूमिका योग्य नाही, असे स्पष्ट करत सभात्याग केला होता.

त्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेतही रस्त्यांचे पडसाद उमटण्याची शक्‍यता होती. मात्र, महापौर घडामोडे यांनी आज नमते घेत सभा सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चहापानासाठी बोलाविले. 

यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचा विरोधही मावळला. त्यानंतर सभा सुरू होताच शिवसेनेचे राजू वैद्य यांनी रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळाला, त्याबद्दल प्रयत्न करणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी केली. महापौरांनीही माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी हा प्रस्ताव दिला होता, असा उल्लेख करत निधीसाठी सर्व लोकप्रतिनिधींसह मी पाठपुरावा केला, मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी निधी दिला, असे स्पष्ट केले व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करण्यात येत आहे, असा ठराव मंजूर केला.  तत्पूर्वी, एमआयएम नगरसेवकांचे प्रस्ताव स्थगित ठेवल्याचा मुद्दा शेख समिना यांनी उपस्थित केला. त्यावरून नगरसेवक महापौरांच्या डायससमोर जमा झाले. यावेळी एमआयएम व भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. 

‘सोनूवर भरोसा नाय काय... नाय काय...’ 
श्रेयाच्या राजकारणावर तोडगा निघत असतानाच सभागृहात ‘सोनू’ने एन्ट्री केली. राजू शिंदे म्हणाले, की गेल्या बैठकीत महापौर सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करणार होते, मात्र तुम्हालाच वेळ नव्हता, सभात्याग केला. ‘सोनूवर तुमचा भरोसा नाय काय... नाय काय...’ असे म्हणत शिवसेनेला डिवचले. त्यावर शिवसेनेनेही ‘तुमचाच सोनूवर भरोसा नाय... नाय...’ असे म्हणत भाजप नगरसेवकांना प्रत्युत्तर दिले. 

...तर माझ्याविरोधात निवडणूक लढवा 
सातारा-देवळाई परिसरात साडेआठ कोटींचे रस्ते करण्याचा अशासकीय प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यावरूनही शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला. सिद्धांत शिरसाट यांनी दहा रस्त्यांच्या यादीतील एमआयटी कॉलेज ते सातारा गाव या रस्त्याचे काम महापालिकेने यापूर्वीच मंजूर केले असून, या रस्त्याच्या जागेवर दुसरा रस्ता घ्यावा, डांबरीकरण न करता व्हाईट टॉपिंगची कामे करण्यात यावीत, अशी सूचना केली. त्यावर संतापलेल्या अप्पासाहेब हिवाळे यांनी हा माझा वॉर्ड आहे, मी इतरांच्या वॉर्डात डोकावतो का? या भागाचा एवढाच कळवळा असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवा, असे आव्हान दिले. शिवसेनेतर्फे त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले यांनी हा जनतेचा पैसा आहे, असे म्हणत हिवाळे यांना उत्तर दिले. सायली जमादार यांनीही वॉर्डातील नगरसेवकांच्या सूचनेनुसारच रस्त्यांची निवड करावी, अशी मागणी केली. त्यात राजू शिंदे यांनी त्या भागातील आमदारांना जनतेची एवढी काळजी असेल तर पाण्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे, असा चिमटा काढला. श्री. तुपे यांनी लोकप्रतिनिधी आपापल्या परीने काम करत असतात, त्यामुळे कोणी असे विषय सभागृहात आणू नयेत, अशी सूचना केली.

Web Title: aurangabad marathwada news politics in municipal