खरेदी-विक्री दस्तनोंदणी व्यवहाराला "ब्रेक'

शेखलाल शेख
बुधवार, 21 जून 2017

नोटाबंदीचा फटका; महसुलात 756 कोटींनी घट

नोटाबंदीचा फटका; महसुलात 756 कोटींनी घट
औरंगाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यभरात खरेदी-विक्री दस्तनोंदणी व्यवहाराला मोठा ब्रेक लागला होता. त्याचा मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाला चांगलाच फटका बसला. वर्ष 2015-16 मध्ये 23 लाख 8 हजार 809 दस्तांची नोंदणी झाली होती; मात्र2016-17 मध्ये यामध्ये एक लाख 86 हजार 218 रुपयांनी घट होऊन 21 लाख 22 हजार 591 दस्तांची नोंदणी झाली. 2015-16 मध्ये मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाला 21767.01 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता; पण नोटाबंदीने दस्तामध्ये घट झाल्याने 2016-17 मध्ये 21010.13 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 756 कोटी 88 लाखांची घट झाली.

नोटाबंदीनंतर नोंदणी व मुद्रांक विभागातील दस्तनोंदणीत तब्बल पन्नास टक्‍क्‍यांची घट झाली होती. त्या वेळी फक्त सध्या खरेदी-विक्री, इसार पावती, भाडे करारनामा यांसारखे किरकोळ व्यवहार झाले. याचा फटका मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क वसुलीवर झाला आहे. राज्य सरकारला 756 कोटी 88 लाखांचा फटका सहन करावा लागला. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क भरणा, गहाणखत, इसारपावती, भाडे करारनामा, विवाह नोंदणी अशा विविध प्रकारच्या कामकाजाकरिता वर्षाकाठी साधारणपणे दोन कोटी नागरिक नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयांना भेट देतात; पण नोटाबंदीनंतर स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क भरणामध्ये घट झाल्याने कित्येक महिने कोट्यवधींचा महसूल बुडाला.

परिस्थिती पूर्वपदावर
आता काही प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. खरेदी-विक्री व्यवहारांविषयी सध्या विचारणा होत असून, यामध्ये पूर्वीसारखा व्यवहार होण्यास सुरवात झाली आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाकडेही पूर्वीसारखी गर्दी दिसतेय. 2017-18 या वर्षात 19 जूनपर्यंत 5 लाख 14 हजार 334 दस्तांजी नोंदणी झाली, तर 2017-18 या चालू आर्थिक वर्षात 19 जूनपर्यंत 28035.67 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या आकडेवारीवरून दिसते, की नवीन वर्षात खरेदी-विक्री व्यवहाराला चांगलाच वेग आला आहे.

राज्यातील मुद्रांक व नोंदणी शुल्क वसुली
वर्ष.......................दस्त संख्या....................एकूण महसूल (कोटीत)

2004-05.............15,03,763........................4,137.59
2005-06.............16,03,718........................5,307.63
2007-08..............17,36,342........................6,538.61
2008-09...............18,47,259.......................8,538.00
2009-10................17,79,318......................8,384.36
2010-11................19,87,280......................10,901.52
2011-12...............23,18,618........................13,411.26
2011-12................23,14,218.........................14,800
2012-13...............22,97,545...........................17,548
2013-14................23,30,373..........................18,666
2014-15................22,97,929...........................19,959.09
2015-16................23,08,809...........................21,767.01
2016-17................21,22,591............................21,010.13

Web Title: aurangabad marathwada news purchase sailing stamp registration transaction break