रिमोटने वीजचोरी करणाऱ्यांचे रॅकेट उघड

रिमोटने वीजचोरी करणाऱ्यांचे रॅकेट उघड

औरंगाबाद - रिमोटच्या साहाय्याने रीडिंग बंद करून वीजचोरीचा प्रकार महावितरण आणि पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला. या प्रकरणी रिमोट तयार करणाऱ्या एका मुख्य संशयितांसह रिमोट वापरणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, पंधरा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, अशी माहिती शनिवारी (ता. १५) पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, पोलिस उपआयुक्त दीपाली घाटगे, पोलिस उपआयुक्त राहुल श्रीरामे उपस्थित होते.

यादव म्हणाले, की हर्सूल आणि सिडको परिसरात ही कारवाई करण्यात आली. या पद्धतीने वीजचोरी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हर्सूल येथील किशोर रमेश राईकवार (वय ३६) हा गेल्या अनेक दिवसांपासून मीटर बंद करणारे रिमोट बनवीत होता. त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून रिमोट व रिमोट बनविण्याचे साहित्यही जप्त केले आहे. त्याच्यासह सुरेवाडी येथील प्रकाश गायकवाड (वय ४७), अनिल नवले (३७), जाधववाडी येथील सुरेश हिंमत सुरे (५७), सिडको एन- तेरामधील मारोती जयराम पवार, सिडको एन- अकरामधील सदाशिव बाबूलाल राठोड, जिन्सी येथील जफर शहा अमीन शहा यांना अटक केली. दरम्यान, मीटरमध्ये फेरफार करणाऱ्याच्या संशयाआधारे मोहन हरणे, मधुकर गोरे, सुरेश सुरे, सोनाजी बमणे, धनाजी दुबे, शेख रशीद शेख गफूर, रुख्मिणी पौडवाल, शेख रसूल पटेल, कचरू दुबे, शेख रौफ उमर पटेल, आय. आर. पटेल, ज्ञानेश्वर औताडे, गाजराबाई बमणे, मीना वर्मा, अंतकला ढाकणे यांची चौकशी सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक विजय जाधव, अनिल वाघ यांच्यासह महावितरणचे सचिन लालसरे, गणेश जाधव, अविनाश चव्हाण यांनी ही कारवाई केली. 
 

अर्थव्यवस्थेला धोका
यासाठी चिनी बनावटीचे रिमोट वापरले गेले. यामागे राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेला धोका देण्याचाच उद्देश आहे. रिमोट वापरणारे, विक्री करणारे व बनविणारे यांच्यावर विद्युत अधिनियमांसह फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. करोडो रुपयांची वीजचोरी या रिमोटच्या साह्याने होत असल्याने विकासाच्या पैशांचीच चोरी होत आहे. या रिमोटवर बंदी आणावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करणार असल्याचेही यशस्वी यादव यांनी सांगितले.

रिमोट दोन पद्धतीचे 
२०१३ पूर्वीच्या मीटरसाठी डास मारण्यासाठी वापरली जाणारी बॅट, कॅपेसिटर, आयसी आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांच्या साह्याने रिमोट तयार केले जात. यात मीटरशी छेडछाड करण्याची गरज नाही. २०१३ नंतरच्या मीटरसाठीचे रिमोट हे चिनी बनावटीचे आहेत. मुंबईत या रिमोटची किंमत दोनशे ते अडीचशे, तर शहरात दोन हजार रुपयांपर्यंत विकले जाते. यासाठी मीटरमध्ये एक डिव्हाईस जोडावे लागते. ते डिव्हाईस मीटरमध्ये जोडण्याचे काम करणारी टोळी सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. 

हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या पद्धतीने किती चोरी झाली हे अद्याप सांगू शकत नाही; परंतु चोरीचा आकडा कोट्यवधींचा असण्याची शक्‍यता आहे. रिमोट लावण्यात महावितरणच्या कुण्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळला तर त्याच्याविरुद्धही कडक कारवाई करण्यात येईल. 
- ओमप्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com