संग्रामनगर रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

औरंगाबाद - संग्रामनगर येथील रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद करण्यात आले. या ठिकाणी भुयारी मार्ग होणार आहे; मात्र त्याचे कुठलेही काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, याविरोधात परिसरातील नागरिकांनी मेट्रो औरंगाबाद असोसिएशनतर्फे रविवारी (ता. २८) गेटजवळ काळ्या फिती बांधून निदर्शने केली.  

या ठिकाणी रेल्वे रुळावरून उड्डाणपूल झाला; परंतु बीड बायपास, देवानगरी आणि संग्रामनगर येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल दूर पडतो. त्यामुळे दोन्ही बाजूच्या चारशे ते पाचशे कुटुंबांची रेल्वेगेट सुरू ठेवण्याची मागणी होती. यासंदर्भात रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती; परंतु ही याचिका फेटाळण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाने शनिवारी (ता. २७) रेल्वेगेट बंद केले आहे. या निर्णयाचा मेट्रो औरंगाबाद असोसिएशनतर्फे निषेध नोंदविण्यात आला. या ठिकाणी भुयारी मार्गाची मागणी असतानाही रेल्वे प्रशासनाने त्यासंदर्भात कारवाई केली नाही. भुयारी मार्गाचे काम सुरू व्हावे, अशी मागणी करीत रेल्वेगेट बंदचा काळ्या फिती लावून नागरिकांनी निषेध नोंदविला. या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत गोर्डे पाटील, सचिव डॉ. प्रेम खडकीकर, शिवानंद वाडकर, रामदास जीवनवाल, अमर नानकर, योगेश साळवे, बाबूराव डिघोळे, नेत्रा जोशी, गोरक्ष सुंब, दिलीप मिरजगावे, नरेश माढेकर, ज्ञानेश काळे यांनी सहभाग घेतला.

Web Title: aurangabad marathwada news railway gate permanently close