मॉन्सूनपूर्व पावसाचे धुमशान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार; जानवळचा पूल वाहून गेला

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार; जानवळचा पूल वाहून गेला
औरंगाबाद - मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत बुधवारी रात्री उशिरा मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूरच्या दहाही तालुक्‍यांत तो दमदारपणे कोसळला. बारा महसूल मंडलांत 60 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. चाकूर तालुक्‍यात झालेल्या दुफानी पावसाने लातूर-अहमदपूर मार्गावरील जानवळमधील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उस्मानाबादच्या सात महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. बीड, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांच्या काही भागातही पाऊस झाला.

गावांचा संपर्क तुटला
लातूर - जिल्ह्यात रात्री दहाही तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाला. बारा महसूल मंडलांत 60 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. चाकूर तालुक्‍यातील झरी महसूल मंडलांत, तर रात्रीतून शंभर मिलिमीटर पाऊस झाला आहे.

उस्मानाबादला झोडपले
उस्मानाबाद - जिल्ह्यातील सात महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. उमरगा तालुक्‍यात एकाच रात्रीत शंभर मिलिमीटर पाऊस कोसळला. सर्वाधिक 154 मिलिमीटर पाऊस दाळिंब महसूल मंडलात झाला. डिग्गी- बेडगा (ता. उमरगा) रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तुळजापूर, लोहारा, उमरगा, उस्मानाबाद तालुक्‍यांत जोरदार पाऊस.

अंबाजोगाई, माजलगाव भागात पाऊस
बीड - आठवडाभरात जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. अंबाजोगाई शहर व परिसरात पहाटे सुमारे तासभरात 71 मिलिमीटर पाऊस झाला. माजलगाव भागातही चांगल्या सरी कोसळल्या. धारूर भागात रिमझिम तर गेवराई तालुक्‍यातील काही भागातही बऱ्यापैकी पाऊस झाला.

औरंगाबादमध्येही सलामी
औरंगाबाद शहरात आज दुपारी तीनच्या सुमारास सुमारे अर्धा तास चांगल्या सरी कोसळल्या. गंगापूर तालुक्‍यात सकाळपासून संततधार सुरू होती. पैठण येथील बिडकीन, निपाणी, आडगाव झाल्टा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वैजापूर शहरासह महालगाव, तर सिल्लोड तालुक्‍यातील रहिमाबाद, निल्लोड परिसरात सरी कोसळल्या.

Web Title: aurangabad marathwada news rain