दलित ऐक्‍याचे नेतृत्व आंबेडकरांनी स्वीकारावे - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - दलित ऐक्‍याला माझा कधीच विरोध नाही. ऐक्‍याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे. त्यांनी सर्वांना एकत्र करून कार्यकर्त्यांपर्यंत सत्ता पोचविण्याचे काम करावे. या ऐक्‍याचे मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्षपद तसेच बौद्ध धर्म स्वीकारून कांशीराम यांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (ता. 29) केले आहे.

येथे पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, की राहुल गांधींपेक्षा उद्धव ठाकरे हुशार आहेत. राहुल गांधींचा प्रचार चांगला सुरू असला तरी गुजरातमध्ये "आरपीआय'चा पाठिंबा भाजपला आहे. त्यासाठी मी प्रचारसभाही घेणार आहे. मला लोकसभा लढवायची असल्याने ती निवडणूक मी मुंबई, शिर्डी, पंढरपूर, लातूर अशी कुठूनही लढेन. मात्र, त्यासाठी शिवसेना-भाजपची युती आवश्‍यक आहे. मी एकट्याच्या बळावर निवडून येऊ शकत नाही, हे वास्तव आहे. आम्हाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळविण्यासाठी दोन जागा निवडून येणे आवश्‍यक आहे.

दुसऱ्या समाजाला काही मिळत असेल, तर त्याला विरोध करू नका, असा सल्ला आठवले यांनी या वेळी दिला. मराठा, पाटीदार, जाट, राजपूत, ठाकूर, ब्राह्मण यांच्यासाठी आरक्षणाच्या संदर्भात विशेष तरतूद करावी. त्यासाठी लोकसभेत कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मोहन भागवत काय म्हणतात, त्यापेक्षा नरेंद्र मोदी काय म्हणतात, याला महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही संघासोबत नसून मोदींसोबत आहोत. ताजमहाल जागतिक आश्‍चर्याची वास्तू आहे. ती आमच्या मातीतल्या लोकांनी बांधली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: aurangabad marathwada news ramdas athawale talking