महसूल रेकॉर्डचे स्कॅनिंग संपता संपेना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महिनाभराची मुदत; अन्यथा दाखल होणार गुन्हे 
औरंगाबाद - महसूल विभागातील जीर्ण झालेले ऐतिहासिक दस्तावेज आणि दरवर्षी जमा होणारे महत्त्वाचे रेकॉर्ड दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी स्कॅनिंगचे काम हाती घेण्यात आले. मात्र, स्कॅनिंगचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण झालेले नाही. आता महिनाभरात स्कॅनिंगचे काम पूर्ण न केल्यास संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे.

राज्यातील महसूल विभागाच्या रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय २०१४-१५ मध्ये घेण्यात आला. महसूल विभागाकडे शहरांसह गावागावांचे ऐतिहासिक जीर्ण दस्तावेजांची नोंदणी घेणे अवघड जात होते.

जुने आणि निजामकालीन रेकॉर्ड महसूल विभागाकडे प्राप्त असले, तरी त्याची योग्यरीतीने जपणूक होत नसल्याने ते तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. संगणकीकृत डाटा तयार करण्यासाठी अडचणी येत असल्याने स्कॅनिंग करून रेकॉर्ड जपवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शासनाकडून वर्ष २०१५-१६ मध्ये रेकॉर्ड स्कॅनिंगसाठी निविदा मागविण्यात आली. राज्यातील ३४ जिल्ह्यांच्या रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्यासाठी एजन्सीला काम दिले. मराठवाड्यातील औरंगाबादसह सात जिल्ह्यांचे काम रिको एजन्सीला, तर लातूर जिल्ह्याचे काम कार्व्हो एजन्सीला देण्यात आले. काम पूर्ण करण्याची मुदत डिसेंबर २०१६ पर्यंत देण्यात आली होती. कागदपत्रांची संख्या कोटींच्या घरात असल्यामुळे मुदतीमध्ये हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे एजन्सीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. तरीही काम पूर्ण होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. आता महिनाभरात स्कॅनिंगचे काम पूर्ण न झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा एजन्सीला देण्यात आला आहे.
 
५४ लाख कागदपत्रांचे होणार स्कॅनिंग
औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांच्या रेकॉर्ड विभागातील ५४ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग करून त्याची तपासणी केली जाणार आहे. रिको एजन्सीने आतापर्यंत ४० लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग केले आहे. मात्र, त्याची तपासणी करण्यात आलेली नाही. उर्वरित रेकॉर्ड स्कॅनिंगचे काम अपूर्ण आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी रिको एजन्सीला अतिरिक्त स्कॅनिंग मशीन, संगणक आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: aurangabad marathwada news revenue record scanning