दीडशे कोटींच्या रस्त्यांचा नारळ फोडण्याची पुन्हा घाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - शहरातील १५२ कोटींच्या रस्त्यांचा नारळ फोडण्यासाठी महापौर भगवान घडामोडे यांनी पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. रस्त्याच्या उद्‌घाटनासाठी वेळ द्यावा, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी सोमवारी (ता. नऊ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

शासनाने शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जून महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या निधीची निविदा काढण्यासाठी महापालिकेला तीन महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात शासन निधीतून करण्यात येणाऱ्या शंभर कोटींसह महापालिकेच्या निधीतून करण्यात येणाऱ्या डिफर्ड पेमेंटवरील ५२ कोटींच्या रस्त्यांच्या निविदा काढण्यात आल्या. ५२ रस्त्यांसाठी सहा निविदा असून, त्या दाखल करण्यासाठी २५ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

महापौर घडामोडे यांनी शंभर कोटींचा निधी आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे आपल्याच कार्यकाळात कामाचा नारळ फुटला पाहिजे, यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. त्यांचा कार्यकाळ २८ ऑक्‍टोबरला संपणार आहे. त्यापूर्वीच रस्तेकामाचा प्रारंभ करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

यापूर्वीही केला होता प्रयत्न 
महापौरांनी यापूर्वीदेखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी गळ घातली होती; मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना नारळ फोडणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी महापौरांना तातडीने निविदाप्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या होत्या; पण पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी नारळ फोडण्यासाठी महापौरांनी प्रयत्न सुरू केले आहे. 

शिवसेनेला श्रेय मिळू नये म्हणून...
शंभर कोटींच्या निधीच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये यापूर्वीच कलगीतुरा रंगला होता. दरम्यान, पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद शिवसेनेकडे राहणार आहे. त्यांच्या कार्यकाळात रस्त्यांच्या कामाचे उद्‌घाटन झाल्यास श्रेय भाजपकडे न येता शिवसेनेकडे जाऊ शकते? असे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: aurangabad marathwada news road opening