सर्व्हरमुळे आरटीओचे काम 'डाउन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

'एनआयसी'च्या संगणक प्रणालीत अडथळा; कामकाज रखडले, नागरिकांना मनस्ताप

'एनआयसी'च्या संगणक प्रणालीत अडथळा; कामकाज रखडले, नागरिकांना मनस्ताप
औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) संपूर्ण देशभरात अनेक राज्यांत संगणकीकरण करण्यात आलेले आहे. मात्र याचे मुख्यालय असलेल्या एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर) या डेटा सेंटरचे सर्व्हर डाउन झाल्याने "आरटीओ'च्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. दिवसभर कुठलेही कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.

औरंगाबाद आरटीओ कार्यालयाचे 20 ऑक्‍टोबर 2016 रोजी संपूर्ण संगणकीकरण झाले. राज्यातील पहिले संपूर्ण ऑनलाइन आरटीओ कार्यालय म्हणून या कार्यालयाची ओळख झाली. नागरिकांची दलालांकडून सुटका व्हावी, वाहनधारकांना घरबसल्या सुविधा व्हावी, कामाची गती वाढावी, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेत 2016 मध्ये संपूर्ण कार्यालय संगणकीकृत करून घेतले. यासाठी जुनी वाहन 0.1 ही प्रणाली 0.4 मध्ये तर सारथी 0.1 कार्यप्रणाली 0.4 मध्ये परावर्तित करुन घेतली. मात्र, सध्या ऑनलाइन प्रणालीच नागरिकांसह आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. या संपूर्ण संगणकीय यंत्रणेवर "एनआयसी' या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणेचे नियंत्रण आहे.

"एनआयसी'चे सर्व्हर गुरुवारी डाउन झाल्याने कामकाजात अडचणी निर्माण झाल्या. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन आलेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. शिकाऊ परवाना आणि पक्का परवाना देण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत होत होत्या. शिकाऊ उमेदवारांची संगणकीय चाचणी सुरू झाल्यानंतर आठ-दहा प्रश्‍न सोडवले की सर्व्हर डाउन होत होते. असे वारंवार होत असल्याने उमेदवारांना वारंवार परीक्षा द्यावी लागत होती, त्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. संगणकीय यंत्रणा कोलमडल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी वारंवार "एनआयसी' अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली, मात्र सर्व्हर डाउन झाल्याने वीस राज्यांत ही समस्या निर्माण झाली, लवकरच सुरळीत होईल एवढेच उत्तर दिले जात होते.

Web Title: aurangabad marathwada news rto work down by server