विद्यापीठात उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

विद्यापीठात उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

खासदार चंद्रकांत खैरेंना कुलगुरूंचे पत्र : चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांचा दोनवेळा फोन

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर्व प्राधिकरणे गठित झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या ठरावाबाबत यथायोग्य कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या शिष्टमंडळाला दिले. चर्चेदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनदा खासदार खैरे यांच्याशी फोनवरून चर्चा करीत कुलगुरूंचे म्हणणे लेखी घेण्यास सांगितले.

कुलगुरूंच्या दालनात सोमवारी (ता. ११) शिष्टमंडळाने भेट घेतली. यात खासदार खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, विनायक पांडे, हिरा सलामपुरे, तुकाराम सराफ आदींची उपस्थिती होती. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलाच पाहिजे. विद्यापीठात राजकारणासाठी पाथ्रीकर, चव्हाण, सावे हे येतील आणि जातीलसुद्धा; मात्र विद्यापीठाची पत तुम्हीच सांभाळली पाहिजे,’’ असे खैरे कुलगुरूंना म्हणाले. पुतळ्याला मान्यता मिळाल्यानेच अर्थसंकल्पात तरतूद केली, मग काम रखडण्याचे कारण काय? अशी विचारणा श्री. घोसाळकर यांनी केली. आम्हीही इतरांसारखे दबाव टाकून कामे करून घेऊ शकतो; पण विद्यापीठाला राजकारणाचा अड्डा बनवायचा नसल्याचे श्री. दानवे यांनी सांगितले.

विद्यापीठ प्रशासनाने निवडणुकांचे कारण समोर करीत या विषयावर तत्काळ निर्णय घेता येणार नसल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ. चोपडे, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. पी. व्ही. जब्दे प्रशासनाची भूमिका मांडत होते.

कुलगुरूंशी चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्याशी खासदार खैरे यांनी फोनवरून चर्चा केली. शिष्टमंडळाने निवेदन देऊन लेखी पत्र स्वीकारले. ठरावात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे ठरले असेल तर, तसेच करा, असेही शिष्टमंडळाने सांगितले. दरम्यान, या वेळी विद्यापीठात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांच्यासह चार पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, कर्मचारी बंदोबस्तावर होते.

पुतळ्याचा ठराव डॉ. चोपडेंच्या काळातच
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतचा ठराव माझ्या कार्यकाळात झाल्याचे मलाच आठवत नसल्याचे कुलगुरूंनी शिष्टमंडळाला सांगितले. यानंतर शिष्टमंडळ आक्रमक झाल्यानंतर मात्र, त्याबाबतची कागदपत्रे मागविली. डॉ. चोपडे यांच्या काळात ९ आणि १६ जुलै २०१५ रोजीच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव पारित केल्याचे कुलसचिव डॉ. जब्दे यांनी शिष्टमंडळाला वाचून दाखविले. प्रस्तावाचा क्रमांक ४८ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अधिकार मंडळानंतर शिंदेंविषयी निर्णय
निलंबित जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे आणि बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर यांना बडतर्फ करा, अशी मागणी पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीने केली. याबाबत, अधिकार मंडळे स्थापल्यानंतर त्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन डॉ. गाडे यांच्या शिष्टमंडळाला दिल्याचा दावा गुणरत्न सोनवणे यांनी केला.

खासदारांची एंट्री टेबलावरून...
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीचे डॉ. सिद्धांत गाडे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होते. त्यादरम्यान खासदार खैरे यांच्यासह शिष्टमंडळाला आंदोलनकर्त्या महिलांनी तिथून प्रवेश नाकारला. त्यानंतर पीजी सेक्‍शनच्या दरवाजातून खुर्ची, टेबलावर उडी टाकून मान्यवरांना कुलगुरूंचे दालन गाठावे लागले.

कुलगुरूंची सहीसाठी नकारघंटा
लेखी पत्राबाबत कुलगुरूंचा नकार होताच. या वेळी खासदार खैरेंनी पत्र दिल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर कुलगुरूंनी पत्र दिले. त्यानंतर विद्यापीठाच्या पत्रावर फक्‍त कुलसचिवांचीच सही घ्या, असे कुलगुरू सुचवीत होते; मात्र शिष्टमंडळ कुलगुरूंच्या सहीसाठी आग्रही राहिले. आढेवेढे घेत शेवटी कुलगुरूंनी सही केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com