आता गरज स्मार्ट वाहतुकीची!

मनोज साखरे
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - बेफाम धावणारी वाहने, दुरवस्था झालेले अरुंद रस्ते, खड्‌ड्‌यांची समस्या आणि वारंवार होणारे अपघात या बाबी आता गंभीर बनल्या आहेत. परिणामी, रस्त्यांवर अपघात होऊन मृत्यू ओढवण्याची भीती कायम असून, यावर मात करण्यासाठी व सुरळीत, सुरक्षित सक्षम वाहतुकीसाठी आता स्मार्ट प्रयत्नांची गरज आहे.  

औरंगाबाद - बेफाम धावणारी वाहने, दुरवस्था झालेले अरुंद रस्ते, खड्‌ड्‌यांची समस्या आणि वारंवार होणारे अपघात या बाबी आता गंभीर बनल्या आहेत. परिणामी, रस्त्यांवर अपघात होऊन मृत्यू ओढवण्याची भीती कायम असून, यावर मात करण्यासाठी व सुरळीत, सुरक्षित सक्षम वाहतुकीसाठी आता स्मार्ट प्रयत्नांची गरज आहे.  

शहरातील महावीर चौकापासून नगर नाका व तेथून पुणे, मुंबई, धुळ्याकडे जाणारे राज्यमार्ग, बीड बायपास आदी रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. हे रस्ते वाहतुकीस फारसे सुरक्षित नसल्याची जाणीव वाहन चालविल्यानंतर होते. काही रस्त्यांची दयनीय अवस्था असून, अर्धा ते एक फुटाचे असंख्य खड्डे तयार झालेत. यादरम्यान रिक्षा व दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातच शहरातील महत्त्वाचे चौक, बाबा पेट्रोलपंप ते नगर नाक्‍यापर्यंत रिक्षा, खासगी बससह अवैध वाहतूक वाढली. अपघाती मृत्यू ही मोठी नामुष्की असून, त्याचे अनिष्ट सामाजिक परिणामही समोर येतात. या सर्व समस्यांवर स्मार्ट उपायांची गरज असून, त्यादृष्टीने वाहतूक विभाग, महापालिका, जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रित येऊन एक वाहतूक विकास कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.

नगर नाका-वाळूज 
नगर नाक्‍यापासून वाळूजकडे जाणाऱ्या वाहनांची लक्षणीय वर्दळ आहे. रस्तेही अरुंद असून, महावीर चौक ते छावणी हद्दीपर्यंत दुभाजक नाहीत. लोखंडी पुलाची दुरवस्था, त्यानंतर वाळूज महानगर हद्दीपासून चौपदरी रस्त्यावर बेफाम वाहने धावतात. या वाहनांच्या गतीवर मर्यादा नाहीत.

नगर नाका ते दौलताबाद
नगर नाका ते दौलताबाद मार्गावर अपघातांचे प्रमाण चिंताजनक असून, या रस्त्यांत ठिकठिकाणी दुभाजकांचा अभाव आहे. शहराचे विस्तारीकरण व औद्योगिकरणामुळे वाहनांची संख्या वाढली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वाहतुकीतही वाढ झाली; मात्र पर्यायी रस्ते निर्मिती झाली नाही.

यामुळे अपघाताला निमंत्रण 
अनेक मार्गांवर दुभाजकांचा अभाव 
काही रस्त्यांवर विद्युत दिव्यांचा अभाव 
बेदरकार वाहनांच्या गतीवर चाप नाही 
वाहनचालकांचा हलगर्जीपणा

या करता येतील उपाययोजना -
रस्त्यांची रुंदी वाढविण्याची गरज 
स्पीड लिमिटचा वापर व्हावा 
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कडक कार्यवाही 
वाहतूक पोलिसांनी रात्रपाळी करून गस्त वाढवावी 
दर महिन्याला प्रशासनाकडून वाहतुकीचे ऑडिट व्हावे.
रात्रीच्या वेळी बेफाम ट्रॅव्हल्स, वाहनांवर कारवाई
अद्ययावत वाहतूक पद्धतीचा व्हावा अवलंब

सुसाट वाहनांचा प्रश्‍न...
शहरात सुसाट वाहने धावतात. परिणामी, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. रस्ता ओलांडतानाही धडक बसून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा वाहनांवर कारवाईसाठी स्पीडगण आहेत; परंतु वेगावर फारसा अंकुश लागला असे म्हणता येणार नाही. 

उचलेगिरीची मोठी समस्या
शहरात पार्किंग नसल्याने नागरिकांना नाइलाज म्हणून रस्त्यालगत दुचाकी लावावी लागते. रुग्णालये, बाजारपेठ आदी ठिकाणांहून सर्रास दुचाकी उचलल्या जातात. विशेषत: रस्त्यात अडथळा नसतानाही असे प्रकार घडतात. यावरही पोलिस विभागाने लक्ष देऊन लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे.

रिक्षास्टॅंडवर नियंत्रण हवे
चौकात पिंगा घालणाऱ्या रिक्षांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सिडको चौकातही अशाच प्रकाराने दोनजणांना जीव गमवावा लागला. अपघात टाळून सुरक्षित वाहतुकीसाठी ठिकाणे निश्‍चित करून रिक्षा स्टॅंड ठरवावेत; तसेच चौकात थांबणाऱ्या रिक्षांसाठी शाश्‍वत उपाय योजावेत. 

रात्रीच्या रिक्षांवरही व्हावी कारवाई
रात्रीच्या वेळी बहुतांश रिक्षाचालकांना आयते रान मिळते. यात काही चालक मद्य, गांजासह मादक पदार्थांचे सेवन करून धोकादायकपणे रिक्षा चालवितात. जादा प्रवासी बसवून प्रवाशांना अरेरावी, लुबाडणुकीचे प्रकार घडले आहेत. आठवड्यात दोन मोहीम घेऊन ही समस्या सोडविण्यावर पोलिस विभागाने भर द्यावा.

ड्रिंक अँड ड्राइव्हवर व्हावी कारवाई
शहर व पंचक्रोशीत रस्त्यालगत ढाबे व हॉटेल्सची संख्या अधिक आहे. यात दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. दारूच्या नशेत अपघात घडून अनेकांचा बळी गेला आहे, त्यामुळे ड्रिंक अँड ड्राइव्हविरुद्ध कारवाईची गरज आहे. 

पोलिस विभागासमोरील प्रश्‍न
वाहतूक पोलिसांची तोकडी संख्या ही एक समस्या पोलिस विभागाची आहे. भरमसाट अद्ययावत वाहतूक यंत्रणेचा अभाव, कामाचा बोजा, ताणतणाव, वाहनधारकांची होणारी हमरीतुमरी, वाढते प्रदूषण, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आदी समस्याही मोठ्या असून, यावरही उपायांची गरज आहे.  

नागरिकांचीही जबाबदारीही
वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना अरेरावी करण्याचे प्रकार घडतात; तसेच काही वाहनधारक वाहतूक सिग्नल्स पाळत नाहीत. बेफाम वाहने चालवून स्वत:सह इतरांचे जीव धोक्‍यात घालतात. या प्रकारांना फाटा देऊन नागरिकांनीही जबाबदारीने वागल्यास वाहतूक नियमन अधिक सुरक्षित व सक्षम होईल.

Web Title: aurangabad marathwada news smart transport need