गौरी-गणपतीसाठी एसटी सरसावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - गणेशोत्सवाची खरी धूम मुंबई आणि कोकणामध्ये असते. म्हणूनच राज्य परिवहन महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघर या तीन विभागांसाठी एसटीचे विशेष नियोजन केले असून, यासाठी मराठवाड्यातून तब्बल पाचशे बसगाड्या पाठवण्यात येणार आहेत. गणेशोत्सव काळात मुंबईसह कोकणातील वातावरण ढवळून निघत असते. त्यासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नियोजनाचा भाग म्हणून औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद आगाराच्या प्रत्येकी 115; तर जालना 65 आणि लातूर आगारच्या 90 अशा पाचशे बसगाड्या मुंबई, ठाणे, पालघरसाठी पाठविण्यात येत आहेत. 21 ते 30 ऑगस्टदरम्यान या सर्व गाड्या मुंबई ते कोकणाचा प्रवास करतील. यातून मिळणारे उत्पन्नही ज्या आगाराची गाडी आहे, त्यांनाच मिळणार असल्याची माहिती एसटीच्या समितीचे उपमहाव्यवस्थापक मधुकर पटारे यांनी दिली.
Web Title: aurangabad marathwada news st for gauri-ganpati festival