राज्यभर एसटीची पार्सल सेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

औरंगाबाद - एसटी महामंडळाने राज्यस्तरीय असलेली पार्सल सेवा अचानक बंद केली आहे. खासगी एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाने राज्यातील हजारो पार्सल ठप्प झाले आहेत. नवीन पार्सल पाठविणाऱ्यांना खासगी कुरिअरकडे धाव घ्यावी लागत आहे.

राज्य परिवहन मंडळाची पार्सल सेवा महामंडळाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. यासाठी पूर्वी एसटीच्या आस्थापनेवर हमाल हा कर्मचारी संवर्ग कार्यरत होता. राज्यभर कुठेही अगदी भरवशाची पार्सल सेवा म्हणून एसटीच्या पार्सल सेवेची ख्याती होती. मात्र, एसटी महामंडळाने पार्सल सेवेचे खासगीकरण केले. वर्ष 2012 मध्ये राज्यातील पार्सल सेवा "अंकल पार्सल सर्व्हिसेस' या खासगी संस्थेला देण्यात आली होती. असे असतानाच एसटी महामंडळाने अचानक ही सेवा बंद करून टाकली. "अंकल सर्व्हिसेस'ने कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवून महामंडळाने एजन्सीकडून ही सेवा काढून घेतली आहे.

सध्या एसटीकडे आलेल्या पार्सलचे पूर्णपूणे वितरण होईपर्यंत हीच संस्था पार्सल वितरण करणार आहे; मात्र नव्याने कुठलेही पार्सल घेण्यास कंपनीला मज्जाव करण्यात आला आहे. अचानक पार्सल सेवा बंद झाल्याने एसटीने पार्सल पाठविणाऱ्या शेकडो व्यावसायिकांची पंचाईत झाली आहे. या व्यावसायिकांनी खासगी कुरिअरची मदत घेण्यास सुरवात केली आहे. एसटी महामंडळ नवीन एजन्सीकडे हे काम सोपविणार असल्याची चर्चा सध्या अधिकारी वर्तुळात सुरू आहे.

Web Title: aurangabad marathwada news st parcel service close