तीन कंत्राटदारांवर स्थायी समिती मेहेरबान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

औरंगाबाद - वर्षभरापूर्वी काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या तीन कंत्राटदारांवर महापालिका स्थायी समिती मेहेरबान झाली आहे. या कंत्राटदारांना काळ्या यादीतून वगळण्याचा निर्णय बुधवारी (ता. २४) घेण्यात आला. 

औरंगाबाद - वर्षभरापूर्वी काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या तीन कंत्राटदारांवर महापालिका स्थायी समिती मेहेरबान झाली आहे. या कंत्राटदारांना काळ्या यादीतून वगळण्याचा निर्णय बुधवारी (ता. २४) घेण्यात आला. 

महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बुधवारी सभापती गजानन बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात शुभांगी कन्स्ट्रक्‍शन, विनस्टार कन्स्ट्रक्‍शन आणि शेख मुजाहेद सादिक शेख यांनी काळ्या यादीतून वगळण्यासाठी अपील केले होते. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ही कारवाई केली होती. श्री. बकोरिया यांनी दीड वर्षांपूर्वी शहरातील काही कामांची पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाकडून गुणवत्ता तपासणी करून घेतली होती. त्यात अनेक कामे निकृष्ट दर्जाची व निविदेतील अटी शर्तींप्रमाणे झाली नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यातील अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी किमतीची निविदा भरून काम घेतले व ते काम पूर्ण न केल्याचा ठपका असलेल्या शुभांगी कन्स्ट्रक्‍शन, विनस्टार कन्स्ट्रक्‍शन आणि शेख मुजाहेद सादिक शेख या तीन ठेकेदारांनी केलेले अपील बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आले. निविदा भरताना जास्तीऐवजी कमी दराचा उल्लेख झाल्याने हा गोंधळ झाला, म्हणून ती कामे करता आली नाहीत, असा खुलासा या कंत्राटदारांच्यातर्फे करण्यात आला. त्यानंतर स्थायी समितीने या तिघांवरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी फिरवला होता निर्णय 
‘जीएनआय’ या कंत्राटदाराने ऑगस्ट महिन्यात स्थायी समितीकडे अपील करून काळ्या यादीतून बाहेर काढण्याची विनंती केली होती. स्थायी समितीने एजन्सीवरील कार्यवाही मागेही घेतली होती; मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्याने स्थायी समितीने निर्णय घेतला. या निर्णयामुळे अडचणीत येण्याची शक्‍यता असल्याने सभापतींनी नंतर हा निर्णय मागे घेतला.

Web Title: aurangabad marathwada news standing committee contractor