जमावबंदीनंतर तणावपूर्ण शांतता

जमावबंदीनंतर तणावपूर्ण शांतता

औरंगाबाद - भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद सोमवारनंतर मंगळवारीही (ता. दोन) औरंगाबाद शहरात उमटले. टीव्ही सेंटर, सिद्धार्थनगर, मयूरनगर, उस्मानपुरा, रमानगर, जवाहरनगर, सूतगिरणी चौक आदी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिस व आंदोलक समोरासमोर आले होते. यात अश्रुधूर व हवेत चार फैरी झाडण्यात आल्या, तर काही ठिकाणी सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

टीव्ही सेंटर भागातील सिद्धार्थनगर परिसरात सकाळी अकराच्या सुमारास मोठा जमाव रस्त्यावर चालून आला. त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने पटापट बंद केली. जमावाने पोलिसांना लक्ष्य केले. त्यांच्यावर व वाहनांवर दगड व विटांचा मारा केला. यात चार पोलिस जखमी झाले असून, एकाच्या डोळ्याला तर दुसऱ्याच्या डोक्‍याला लागल्याने ते गंभीर झाले आहेत. जखमी पोलिसांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

दरम्यान, प्रकरण चिघळत असल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, तरीही जमाव मागे हटण्यास तयार नव्हता. त्यामुळे टीव्ही सेंटर व संपूर्ण परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून केले. दरम्यान, आंबेडकरनगर, रमानगर भागात टायर जाळण्याचे प्रकार घडले. तसेच मोंढा नाका परिसरातील अभिनय थिएटरजवळ कारही पेटविण्यात आली. 

दिवसभरातील घडामोडी
टीव्ही सेंटर, उस्मानपुरा, आंबेडकरनगर, जटवाडा परिसरात पोलिस बंदोबस्त 
जमावाचा रोष वाढल्यानंतर जमावबंदी मंगळवारी सकाळी साडेअकरानंतर लागू 
दगडफेकीत पाच पोलिस जखमी. एक एसीपी, दोन निरीक्षकांचा समावेश
पोलिसांच्या लाठीमारात सतरा जण जखमी, टीव्ही सेंटरला फोडल्या अश्रुधुरांच्या नळकांड्या
शहरात काही ठिकाणी सौम्य लाठीमार, एसआरपीएफच्या चार कंपन्या तैनात
आयजीपी, उपायुक्त, एसीपीसह ३५ पोलिस निरीक्षक, सुमारे १३० सहायक तैनात
शहर मुख्यालय, ठाणे रिकामे, सुमारे साडेतीन हजार पोलिस बळ तैनात  
गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू, दगडफेक करणारे काहीजण ताब्यात.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका, शांतता राखा, परिस्थिती नियंत्रणात आहे. अनुचित प्रकार टाळा, अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे नोंद केले जातील. शहरात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्रित थांबू नये. विशेषत: पोलिसांना कारवाया करण्यास भाग पाडू नका. सोशल मीडियाद्वारे अफवा व आक्षेपार्ह संदेश पाठवू नका. असे मॅसेजस स्वत: डिलीट करा, ते फॉरवर्ड करू नका. 
- दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्त.

आयजींच्या वाहनावर भिरकाविले दगड
विशेष महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी तात्पुरता आयुक्‍तपदाचा पदभार घेतला आहे. टीव्ही सेंटर परिसरात तणाव वाढल्यानंतर ते सकाळच्या सत्रात तेथे पोचले. त्या वेळी त्यांच्या वाहनावर टोळक्‍यांनी दगड भिरकाविले. यातील एक दगड त्यांच्या वाहनावर लागला. यात कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर त्यांनी वाहन बदलून सुटीवर गेलेले आयुक्त यशस्वी यादव यांचे वाहन वापरल्याचे ते म्हणाले.

शेकडो वाहनांचे नुकसान
दगडफेकीमुळे अनेक वाहनांच्या काचा फुटल्या, काही वाहने पेटविण्यात आली. त्यामुळे शेकडोंवर वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनांमुळे रस्त्यावर तुरळक वर्दळ होती.

पोलिस-दलित पदाधिकाऱ्यांची बैठक
पोलिस व दलित पदाधिकाऱ्यांची दुपारी दोनच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. तत्पूर्वी सुभेदारी येथेही बैठक झाली. यात पोलिसांनी सर्वतोपरी दलित समाजाला मदत करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच सुरक्षा पुरविण्याबाबतही आश्‍वासित केले. परंतु, बैठकीत दलित पदाधिकारी समाधानी झाले नाहीत. पोलिसांनी पकडलेल्या कार्यकर्त्यांना आधी सोडून द्यावे, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करू नयेत, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता.

रेल्वे ट्रॅकवर फेकले जळते टायर 
शहरातील वातावरण तणावग्रस्त झालेले असताना मंगळवारी (ता. दोन) दुपारी एक वाजता नागसेननगर रेल्वे गेटजवळ (क्र. ५३) जमावाने रेल्वे रुळावर जळते टायर फेकले. रेल्वे येण्याच्या वेळेलाच टायर जाळल्याच्या घटनेने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. यामध्ये तपोवन एक्स्प्रेस तब्बल एक तास चिकलठाणा रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली. घटनास्थळी धाव घेतलेल्या रेल्वे पोलिसांवर प्रचंड दगडफेकही करण्यात आली. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षकासह तिघेजण जखमी झाले. 

उस्मानपुरा भागात पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीहल्ला केला, त्यानंतर जमाव संतप्त झाला. यातच रेल्वे रुळावर टायर पेटवून देण्यात आले. विशेष म्हणजे, नांदेड-तपोवन एक्स्प्रेस येण्याची वेळ झालेली होती.

मात्र, रुळावर जळते टायर असल्याच्या माहितीनंतर स्टेशन अधीक्षक लक्ष्मीकांत जाखडे यांनी तपोवन एक्स्प्रेस चिकलठाणा रेल्वेस्थानकावर थांबविली. दरम्यानच्या काळात रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक अरविंद शर्मा, लोहमार्ग पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोडे, कर्मचारी यू. आर. ढोबाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये तिघेही जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर स्टेशन अधीक्षक जाखडे यांनी पोलिस आयुक्तालयाचे पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच शहर विभागाच्या पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोचला. रुळावरील जळते टायर विझवून बाजूला करण्यात आले. त्यानंतर चार वाजता तपोवन एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वेस्थानकात आली. रेल्वे रुळावर जळते टायर टाकून घातपात घडविण्याचा हा प्रयत्न असल्याची शक्‍यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली.

पेट्रोल बाँब भिरकावला
औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर काहीकाळ तणाव झाल्यानंतर रस्त्यावर पेट्रोल बाँब भिरकाविल्याची बाब प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. यानंतर पोलिसांनी तो निकामी केला. त्यामुळे अनर्थ टळला. बाटलीत पेट्रोल व त्यात वात असल्याची बाब समोर आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com