पुन्हा प्रेमप्रकरण, पुन्हा आत्महत्या!

पुन्हा प्रेमप्रकरण,  पुन्हा आत्महत्या!

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. १२) दुपारी एकच्या सुमारास उघड झाली. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. गणेश शंकरराव कोपूरवाड (वय २३) असे मृताचे नाव आहे. 

गणेश हा मूळ बिलोली (जि. नांदेड) येथील होता. तो व त्याचा लहान भाऊ उमेश याने दहावीपर्यंत एकाच वर्गात शिक्षण घेतले होते. उमेशला तो सर्व काही बाबी शेअर करायचा. अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून गणेशने विद्यापीठात बी.एस्सी. कॉम्प्युटरमध्ये प्रवेश घेतला. 

दरम्यान, उमेश अर्थशास्त्राच्या पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून, दोघे पार्वतीनगर येथे राहत होते. काही दिवसांपूर्वीच पदव्युत्तर शिक्षणासाठी गणेशने विद्यापीठात अर्ज केला होता. यासासाठीच तो शनिवारी (ता. नऊ) विद्यापीठात आला व छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहात मुक्कामी थांबला. सोबत उमेशही होता. मंगळवारी सकाळी गणेशने भाऊ उमेश व मित्रासोबत जेवण केले. त्यानंतर सर्वजण आपापल्या विभागात लेक्‍चरसाठी गेले; पण गणेश खोलीत एकटाच थांबला. दुपारी एकच्या सुमारास उमेश वसतिगृहाच्या खोलीत आला. त्याने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर गणेशने चादरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसले. हादरलेल्या उमेशने ही बाब मित्रांना सांगितली. 

दरम्यान, विद्यार्थ्यांनी घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना दिली. पोलिसांना खोलीत एक सुसाईड नोट सापडली असून, ती जप्त करण्यात आली. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात झाली.

‘तू आईला सांभाळून घे’
‘भाऊ, मला एक मुलगी खूप त्रास देत आहे. मी आत्महत्या करतो. तू आईला सांभाळून घे!’ असा मजकूर असलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, ती गणेशने मृत्युपूर्वी लिहिली होती. चिठ्ठीवरून गणेशने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.

फेसबुकवर पोस्ट...?
पोलिसांनी माहिती दिली, की दोन महिन्यांपूर्वीच त्याचे एका मुलीशी प्रेम जुळले होते; पण ती दुसऱ्याला बोलत असल्याची बाब गणेशला सहन झाली नाही. त्यातच मुलीकडून काही समस्या उद्‌भवली होती. त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले, की त्याने फेसबुकवर ‘आय हेट गर्ल’ अशी पोस्ट लिहिली व त्यानंतर त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com