विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन गणवेशाविनाच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

महापालिका प्रशासनाने टेकले हात; आजपासून पुण्यात परिषद 
औरंगाबाद - महापालिकेतील बहुतांश विद्यार्थांना यंदा १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळणार नाही, हे आता निश्‍चित झाले आहे. विद्यार्थांचे बॅंकेत खाते उघडण्यात अपयश येत असल्याने प्रशासनाने देखील हात टेकले आहेत.

महापालिका प्रशासनाने टेकले हात; आजपासून पुण्यात परिषद 
औरंगाबाद - महापालिकेतील बहुतांश विद्यार्थांना यंदा १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळणार नाही, हे आता निश्‍चित झाले आहे. विद्यार्थांचे बॅंकेत खाते उघडण्यात अपयश येत असल्याने प्रशासनाने देखील हात टेकले आहेत.

शनिवारी (ता. १२) पुण्यात सचिवांच्या उपस्थितीत शिक्षण परिषद सुरू होत असून, त्यात काय आदेश होतील याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 
महापालिकेच्या मराठी, उर्दू माध्यमांच्या ७० शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे १८ हजार विद्यार्थांना दरवर्षी गणवेश देण्यात येतात. यंदा मात्र शासनाने गणवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची ४०० रुपयांची रक्कम त्याच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने विद्यार्थ्यांना खाते उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या. खाते उघडण्यासाठी पाचशे रुपये लागत असून, गणवेशासाठी मात्र केवळ चारशे रुपये मिळत असल्याने पालकांनी खाते उघडण्याकडे दुर्लक्ष केले आहे, तर खाते उघडण्यासाठी ‘आधार’ सक्ती केल्यानेही अडचणीत भर पडली आहे. 
अनेकांकडे आधारकार्ड नसल्याने खाते उघडण्यास विलंब होत आहे.

महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी बॅंक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांचे झिरो बॅलेन्सवर खाते उघडून देण्याचे आवाहन केले होते. मात्र, अद्याप निम्म्या विद्यार्थ्यांचेही खाते उघडण्यात आलेले नाही.

त्यामुळे गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर खुलासा करताना शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले, की सर्व मुख्याध्यापकांच्या खात्यावर गणवेशाचा निधी वर्ग करण्यात आला असून अद्याप ५० टक्के विद्यार्थ्यांचे खाते उघडलेले नाहीत. चर्चेअंती सभापती गजानन बारवाल यांनी यंदा शंभर टक्के विद्यार्थ्यांना आपण गणवेश देऊ शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. 
 

शासनाच्या आदेशाकडे लक्ष
दरम्यान, पुणे येथे शनिवारपासून शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे. या वेळी शिक्षण विभागाने गणवेशासंदर्भात येणाऱ्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, अशा सूचना स्थायी सभापतींनी केल्या. या संदर्भात शासन काय आदेश देईल, याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले असले तरी यंदाचा १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण विद्यार्थांना जुन्याच गणवेशावर साजरा करावा लागणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news Students' independence day without uniform