'प्रभू'नीं पाठ फिरवताच रेल्वे स्थानकात चोरांचा झटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

औरंगाबाद - रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी पाठ फिरविताच औरंगाबाद रेल्वेस्थानकात दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी प्रवाशाला मोठा हिसका दाखवला. स्थानक परिसरातून महिलेची दोन तोळे सोन्याची साखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली. ही घटना रविवारी (ता. चार) दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.

औरंगाबाद - रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी पाठ फिरविताच औरंगाबाद रेल्वेस्थानकात दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी प्रवाशाला मोठा हिसका दाखवला. स्थानक परिसरातून महिलेची दोन तोळे सोन्याची साखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली. ही घटना रविवारी (ता. चार) दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.

लक्ष्मी ईश्‍वर बागुलवार (वय- 55, रा. कामुल, ता. भैसा, जि. निर्मल, तेलंगणा) या नातेवाईक सुनील बागुलवार (रा. प्रभूनगर, एन-दोन, सिडको) येथे तीन जूनला वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर रविवारी त्या परत निघाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ सुनील व दत्तू बागुलवार, भाची श्‍वेता बागुलवार व विठ्ठल गंगान्ना रेड्डी हे नातेवाईक होते. सिडको येथून सर्वजण रिक्षाने रेल्वेस्थानकासमोर उतरले. यावेळी समोरून एकाच दुचाकीवर दोघेजण आले. मागे बसलेल्याने लक्ष्मी बागूलवार यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपयांची दोन तोळ्यांची साखळी हिसकावली. त्यानंतर उलट दिशेने पोबारा केला. या दरम्यान सर्वांनी आरडाओरड केली, तसेच लक्ष्मी यांच्या भावांनी पाठलागही केला; पण उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना बागूलवार कुटुंबीयांनी दिली.

त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले. पंचनामा व नाकेबंदी केली; पण चोरट्यांचा शोध लागला नाही. या घटनेप्रकरणी लक्ष्मी बागूलवार यांनी तक्रार दिली. त्यानुसार, अनोळखी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध वेदांतनगर पोलिस चौकीत गुन्ह्याची नोंद झाली. तपास सहायक पोलिस निरीक्षक शाहेद सिद्दीकी करत आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू शनिवारी (ता. तीन) शहरात आले होते. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर मोठी गस्त होती. त्यांनी पाठ फिरवताच मात्र, चोरट्याने डाव साधला आणि महिलेचे दागिने हिसकावले.

तोंडाला रुमाल अन्‌..हेल्मेट
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओळखता येऊ नये म्हणून तोंडाला रुमाल बांधलेला होता. तर दुचाकी चालविणाऱ्याने हेल्मेट घातलेले केले होते. मागे बसलेल्याच्या अंगात निळसर काळा शर्ट होता.

रिक्षांतही चोर..
रेल्वेस्थानक परिसरात रिक्षांची गर्दी असते. काही रिक्षाचालकांशी संधान साधलेले चोरटे रिक्षातूनच प्रवाशांच्या बॅगा व पाकीट चोरतात. रेल्वेस्थानकातही चोऱ्या व मोबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत.

Web Title: aurangabad marathwada news thief in railway station