‘तपोवन’मधून पडलेल्या तरुणाला मिळाले उपचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

औरंगाबाद - मुंबई-नांदेड तपोवन एक्‍स्प्रेसमधून पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी एका महिला प्रवाशाने जिवाच्या आकांताने आरडाओरड करून साखळी ओढत रेल्वे थांबवली. तोपर्यंत रेल्वे एक ते दीड किलोमीटर पुढे निघून गेली होती. महिलेच्या धडपडीमुळे जखमी तरुणाला उपचार मिळण्यास मदत झाली आहे. 

औरंगाबाद - मुंबई-नांदेड तपोवन एक्‍स्प्रेसमधून पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी एका महिला प्रवाशाने जिवाच्या आकांताने आरडाओरड करून साखळी ओढत रेल्वे थांबवली. तोपर्यंत रेल्वे एक ते दीड किलोमीटर पुढे निघून गेली होती. महिलेच्या धडपडीमुळे जखमी तरुणाला उपचार मिळण्यास मदत झाली आहे. 

मुंबई-नांदेड तपोवन एक्‍स्प्रेसने सोमवारी (ता. एक) ठाणे येथून दीपक बालासिंग मनावत (रा. अवा, ता भोकरदन) हा तरुण रेल्वेमध्ये बसला होता. प्रवास करत असताना तो लासूर-रोटेगाव दरम्यान असलेल्या करंजगाव रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर तोल जाऊन खाली कोसळला. हा तरुण पडताना पाहून एक महिला प्रवासी मदतीला धावली. तिने आरडाओरड करून रेल्वेची साखळी ओढली. तोपर्यंत रेल्वे दोनशे मीटर पुढे जाऊन थांबली होती. महिलेने तातडीने खाली उतरून रेल्वे चालक व गार्डला गाडी मागे घेऊन जखमी तरुणाला रेल्वेत घेण्याची विनंती केली. त्यावेळी कुणीही पडले नाही, असा पावित्रा रेल्वे चालक व गार्ड यांनी घेतल्याने महिलेने प्रचंड आरडाओरड सुरू केली. त्यामुळे अन्य महिला प्रवाशांनीही हस्तक्षेप करून रेल्वे पाठीमागे घेण्यास भाग पडले, त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी तरुणाला सहप्रवाशांच्या मदतीने रेल्वेच्या सामानाच्या डब्यात घेतले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच औरंगाबादेत रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी यांनी रेल्वे स्टेशन अधीक्षक लक्ष्मीकांत जाखडे यांना माहिती दिली. रेल्वे करंजगाव येथून येईपर्यंत रुग्णवाहिका बोलवून ठेवणे, प्लॅटफॉर्मवर स्ट्रेचरची व्यवस्था करून ठेवण्याची आवश्‍यकता असतानाही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काहीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे रेल्वेगाडी आल्यानंतर स्ट्रेचर आणण्याची धावपळ सुरू झाली. यामध्ये जवळपास अर्ध्या तासाचा वेळ गेला. एकूणच रेल्वे प्रशासनाची उदासिनता बघून सहप्रवाशांनी संताप व्यक्त केला, असे असले तरीही रेल्वेस्थानकावर संतोष सोमाणी, रोहित संचेती व महिलांनी तत्परता दाखवली. सोमाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे कर्मचारी, किंवा लोहमार्ग पोलिस, रेल्वेसुरक्षा बलाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतःच स्ट्रेचर ढकलत जखमीला स्टेशन बाहेर रुग्णवाहिकेपर्यंत आणि त्यानंतर घाटी रुग्णालयापर्यंत पोचवले. हे सर्व सुरू असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी मात्र बघ्याचीच भूमिका घेतली.

Web Title: aurangabad marathwada news treatment to youth