मराठवाड्यात वृक्षलागवड मिशन म्हणून राबविणार - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात वृक्षलागवडीचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. तब्बल 74 लाख 15 हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. वृक्षलागवडीची मोहीम मिशन म्हणून राबविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवार (ता. दोन) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांची उपस्थिती होती.

राज्यासह मराठवाड्यात 1 ते 7 जुलै यादरम्यान 4 कोटी रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. वृक्षलागवडीचा आढावा वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला. मुनगंटीवार म्हणाले, की मराठवाड्यात 74 लाख 15 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट÷ ठरविण्यात आले असून त्यासाठी 47 लाख 35 हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. या महिनाभरात 23 लाख 21 हजार खड्डे खोदले जाणार आहेत. मराठवाड्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी वृक्षलागवड हे मिशन म्हणून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे.

वृक्षलागवड व त्यांचे संरक्षण करण्याकरिता हरित सेना ग्रीम आर्मीसाठी सैनिक म्हणून 12 लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे.

वृक्षलागवडीकरिता 25 जून ते 7 जुलै दरम्यान "रोपे आपल्या दारी' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. संरक्षण विभागामार्फत इको बटालियन 100 हेक्‍टर जमिनीवर वृक्षलागवड करणार आहे. गेल्यावर्षी लावण्यात आलेल्या रोपट्यांपैकी 82 टक्के वृक्ष जगविण्यात आल्याचा दावा वनमंत्री मुनगंटीवर यांनी केला.

Web Title: aurangabad marathwada news tree plantation mission