उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांसोबत संवाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी मार्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिषद घेतली होती. यानंतर आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (ता.२६) औरंगाबादेत येणार आहेत. 

औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी मार्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिषद घेतली होती. यानंतर आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (ता.२६) औरंगाबादेत येणार आहेत. 

औरंगाबाद, वैजापूर व गंगापूर तालुक्‍यांतील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गात जाणार आहेत. सरकारने ‘कितीही किंमत दिली तरी आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत’ असा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केला आहे. शिवसेनेनेदेखील आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे वेळोवेळी जाहीर करून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले. 

महिनाभरापूर्वी शिवसंपर्क मोहिमेच्या आढावा बैठकीनिमित्ताने उद्धव ठाकरे औरंगाबादेत आले होते. त्या वेळी समृद्धी महामार्ग संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन समृद्धी मार्गाला विरोध दर्शविला होता. ‘तुम्ही ठाम राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू’ असा शब्द श्री. ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला होता. त्यानुसार सोमवारी (ता.२६) उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता माळीवाडा व दुपारी बारा वाजता औरंगाबाद तालुक्‍यातील पळशी शहर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची ते भेट घेणार आहेत. तत्पूर्वी गुरुवारी (ता. २२) शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पळशी गावात जाऊन संघर्ष समितीचे नाना पळसकर व इतर शेतकऱ्यांची भेट घेतली.

Web Title: aurangabad marathwada news uddhav thackeray communication with farmer