गणवेशाच्या अनुदानावरून जिल्हा परिषदेचे वस्त्रहरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

चारशे रुपयांसाठी पाचशे रुपये खर्च, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला मुद्दा

औरंगाबाद - गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर ४०० रुपये जमा करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. मात्र, बॅंका  झिरो बॅलेन्सवर खाते उघडण्यास तयार नाहीत. त्यासाठी ५०० रुपये खर्च येत आहे. परिणामी, शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेशाचे अनुदान मिळाले नाही, अशी ओरड जिल्हा परिषद सदस्यांनी मंगळवारी (ता. २५) स्थायी समितीच्या बैठकीत केली. 

चारशे रुपयांसाठी पाचशे रुपये खर्च, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला मुद्दा

औरंगाबाद - गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर ४०० रुपये जमा करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. मात्र, बॅंका  झिरो बॅलेन्सवर खाते उघडण्यास तयार नाहीत. त्यासाठी ५०० रुपये खर्च येत आहे. परिणामी, शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेशाचे अनुदान मिळाले नाही, अशी ओरड जिल्हा परिषद सदस्यांनी मंगळवारी (ता. २५) स्थायी समितीच्या बैठकीत केली. 

अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली. किशोर बलांडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करण्यासाठी रक्‍कम झालेली नाही. ही विद्यार्थ्यांची व पालकांची अडवणूक आहे. यासाठी विद्यार्थ्यांना बेअरर चेक देण्यात यावेत. आधीच शेतकरी दुष्काळात होरपळत असताना त्यांच्या पाल्यांना ४०० रुपये खात्यावर जमा केले जातील, असे सांगून थापा मारत आहे का, असा सवाल त्यांनी केला. रमेश बोरनारे यांनी झिरो बॅलेन्सवर विद्यार्थ्यांना खाते उघडण्याची सोय करून दिली पाहिजे अथवा पालकांच्या खात्यावर ही रक्‍कम जमा करण्यासंदर्भात ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याची सूचना केली. मधुकर वालतुरे यांनी गणवेश खरेदीत शिक्षकांवर यापूर्वी आरोप होत असल्याने शिक्षक संघटनांच्या मागणीनंतरच शासनाने सध्याचा आदेश काढला आहे. मात्र, यामुळे विद्यार्थी, पालकांना त्रास होत असल्याचे सांगून प्रशासनाने बॅंकांना खाते उघडून सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. केशवराव तायडे यांनी विद्यार्थ्यांना अद्याप पैसे का देण्यात आले नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला. विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणाऱ्या या शासन निर्णयाचा निषेध करावा, अशी सूचना रमेश गायकवाड यांना केली; तर बोरनारे, अविनाश गलांडे, किशोर बलांडे यांनी त्यांच्या या सूचनेला अनुमोदन दिले. 

आईचे नाव जोडण्यात अडचणी 
जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांसाठी पंचायत समित्यांना ६ कोटी रुपये मेमध्येच वर्ग करण्यात आलेत; मात्र मार्चमध्ये नवीन आदेश आले. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या नावाने खाती उघडलेली आहेत. मात्र, ४०० रुपये जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नावासोबत आईचेही नाव खात्यात समाविष्ट करायचे आहे, बॅंका यासाठी प्रतिसाद देत नाहीत. बेअरर चेक देण्याविषयी अथवा पालकांच्या खात्यावर रक्‍कम जमा करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेशी बोलण्याचे आश्‍वासन दिले. 

खाते उघडा; अन्यथा कारवाई 
विद्यार्थ्यांचे बॅंक खाते उघडण्यासाठी बॅंकांशी लवकरात लवकर बोला; अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी दिला.

Web Title: aurangabad marathwada news uniform issue in zp school