घाटीत आली संतुलित भूल देणारी अद्ययावत यंत्रे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (घाटी) बधिरीकरणशास्त्र विभागात भूल देणाऱ्या अद्ययावत दोन यंत्रांचे लोकार्पण बुधवारी (ता. २०) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विभागप्रमुख डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. अरविंद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हा नियोजनातून २०१६-१७ च्या मिळालेल्या निधीतून घाटीला ड्रायगर प्रायमस या तंत्रज्ञानाचे तीन यंत्र प्राप्त झाले. त्यापैकी दोन यंत्र ओटी तीन या विभागात, तर एक सीव्हीटीएस विभागात बुधवारी कार्यान्वित करण्यात आले. प्रत्येकी २४.१५ लाखांचे हे यंत्र असून, मोड्युलर अनेस्थेशिया वर्क स्टेशन चे काम ते करते. यामध्ये व्हेंटिलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, अनेस्थेशिया गॅस डिलेव्हरी, इंटिग्रेटेड सर्कल अबसोर्वर सिस्टीम या एकाच यंत्रात समाविष्ट आहे. यामुळे भुलीमधील धोके कमी होऊन, साईड इफेक्‍ट कमी करण्यास मदत मिळते. घाटी प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेले हे पहिलेच अद्ययावत तंत्रज्ञान ठरले, अशी माहिती डॉ. संदीप बोडखे यांनी दिली. 

कोणतीही शस्त्रक्रिया करताना रुग्णाला भूल द्यावी लागते. बॅग आणि बॉटलपासून सुरू झालेले बधिरीकरणशास्त्र आता प्रगत झाले असून, या शास्त्रातील सर्वात प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञान घाटीला प्राप्त झाले आहे. सर्वच वयोगटातील रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार तंतोतंत संतुलित भूल देणे यंत्रामुळे शक्‍य होणार आहे. या यंत्रांच्या माध्यमातून औषधांची बचत होऊन, आर्थिक खर्च कमी होणार असल्याचे डॉ. सुहास जेवळीकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. गेल्या आठवड्यात प्रशासकीय मान्यता मिळालेल्या २०१७-१८ च्या डीपीसीच्या निधीतून अजून दोन यंत्र या विभागाला मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी डॉ. गायत्री तळवलकर, डॉ. राजश्री विर्षिद, डॉ. रश्‍मी बेंगाली,  डॉ. उमर सय्यद, डॉ. संतोष काळुसे, डॉ. निनाद धोपडे, डॉ. अंकिता माने, डॉ. चंचल आदींची उपस्थिती होती.

Web Title: aurangabad marathwada news upadated machines in ghati hospital