नियम मोडणारे ‘सुसाट’

मनोज साखरे
सोमवार, 22 जानेवारी 2018

औरंगाबाद - शहरातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वाहनधारकांना वेग मर्यादा ठरवून दिली; मात्र वाहनाचा वेग तपासण्यासाठी पोलिसांकडे मोजक्‍याच स्पीडगन आहेत. त्यांचाही क्वचितच वापर केला जातो. परिणामी, अनेक चालक ६० ते ८० किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने वाहन चालवत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. 

औरंगाबाद - शहरातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वाहनधारकांना वेग मर्यादा ठरवून दिली; मात्र वाहनाचा वेग तपासण्यासाठी पोलिसांकडे मोजक्‍याच स्पीडगन आहेत. त्यांचाही क्वचितच वापर केला जातो. परिणामी, अनेक चालक ६० ते ८० किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने वाहन चालवत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. 

शहरात वाहतुकीची समस्या वाढतच आहे. बेफाम वेगामुळे अनेक अपघात होऊन नाहक जीव जाण्याचे प्रमाणही चिंताजनक आहेत. सद्यःस्थितीत रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही बाब ‘सकाळ’ने वारंवार अधोरेखित केली. गतिबाजांवर चाप लावण्यासाठी स्पीडगन व अत्याधुनिक वाहतूक तंत्राचे महत्त्व ‘सकाळ’ने २००७ पासून अधोरेखित केले, त्यामुळे पोलिस प्रशासनाने शहरात ४० ची वेग मर्यादा ठरवून दिली. शिवाय स्पीडगनही उपलब्ध करून दिल्या; मात्र त्यांची संख्या मोजकीच आहे. 

पाच रस्त्यांसाठी तीनच स्पीडगन
शहरात बीड, जळगाव बायपास, जालना, हर्सूल आणि वाळूज असे पाच वर्दळीचे रस्ते आहेत; मात्र पोलिस दलाकडे केवळ तीनच स्पीडगन आहेत. त्यांचाही पूर्णपणे वापर होत नाही. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही. काही मोजक्‍या वाहनांवरच कारवाई होत असून, गतिमर्यादा ओलांडणाऱ्या बहुतांश वाहनांवर ठोस कारवाईची गरज आहे.   

रात्री बेफाम वाहतूक
डिजिटल तंत्राचा अवलंब जास्त होत नसल्याने प्राणांतिक अपघाताला चालना मिळत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी बेफाम वाहतूक होते. शंभर व त्यापेक्षा जास्त वेगाने खासगी बस, ट्रक, कार आदी वाहने पळवली जातात. बहुतांश अपघात या वेळातच घडतात; मात्र वाहनचालक वाहनांसह पसार होतात. अशा वाहनांवर स्पीडगन व पोलिसांचाही वचक नाही. 

असे हे तंत्र; पण तुरळक वापर
बेफाम वाहनांच्या नंबर प्लेटचा दीडशे मीटरवरून फोटो मिळतो. दोन किलोमीटर दूरवरील वाहनांचा वेग मोजता येतो. हे उपकरण चार बाय सहा कलर फोटो काढू शकते. त्यात वेळ, तारीख व वेगही नमूद होतो. बीडबायपास रस्त्यावर एमआयटी ते देवळाई चौकादरम्यान स्पीडगनचा वापर होतो; पण वापर व कारवाईची व्याप्ती वाहतूक विभागाला वाढवावी लागेल.

या वेगात धावतात वाहने
शहरातील रस्त्यावर शनिवार व रविवारची स्थिती लक्षात घेता, मध्यरात्रीनंतर मात्र, खासगी बस व कंपन्यांच्या बसेस ऐंशीपेक्षा अधिक वेगाने पळवल्या गेल्या. 

दिवसा कार व अन्य वाहने ६० ते ८० च्या गतीने पळवल्या गेली, तर जड वाहने व दुचाकींची ४० ते ६० अशी गती होती. 

तीनचाकी वाहनांची गती विचारण्याची सोयच नव्हती. या वेळी काही तीनचाकीचे चालक नशेत वाहने चालवत असल्याचे दिसून आले.

Web Title: aurangabad marathwada news vehicle speed rules