यंदाही वाहून जाणार बंधाऱ्यातून पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

गेट बसविण्याच्या निविदेचा प्रस्ताव दुरुस्तीसह पुन्हा येणार

गेट बसविण्याच्या निविदेचा प्रस्ताव दुरुस्तीसह पुन्हा येणार
औरंगाबाद - जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना बसवण्यात येणारे गेट अंतर्गत राजकारणामुळे बसवण्यापूर्वीच शिवसेनेच्या सदस्यांनीच पाडून टाकले. या बंधाऱ्यांवर गेट लावण्याच्या निविदेवर शिवसेना, काँग्रेसच्या काही सदस्यांनी विरोध केल्याने सदस्यांच्या सूचनांचा विचार करत अध्यक्षांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांना शक्‍य आहे तिथे गेट बसवावे तर जिथे सिमेंटची भिंत बांधणे शक्‍य आहे तिथे भिंत बांधण्याची दुरुस्ती करुन नव्याने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचे निर्देश दिले. परिणामी, कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसवण्याच्या निविदेला या सभेत मंजुरी मिळू शकली नाही. पर्यायाने या पावसाळ्यातही या बंधाऱ्यांमधून पाणी वाहून जाणार आहे. 

सार्वत्रिक निवडणुकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १७) जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडली. उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती विलास भुमरे, धनसिंग बेडवाल, मीना शेळके, कुसुम लोहकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, अतिरिक्‍त सीईओ सुरेश बेदमुथा, वासुदेव सोळुंके, सभेच्या सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांची उपस्थिती होती. नवीन सदस्यांची पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने सर्वांना सभेविषयी उत्सुकता होती.

जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसविण्याच्या निविदेवरुन तास दीड तास चाललेल्या या प्रश्नावर सदस्यांचे एकमत झालेच नाही. शासनाने जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांवर गेट बसविण्यासाठी २ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चाची निविदा मंजुरीसाठी सभेपुढे ठेवली. मात्र जुन्या गेटचे काय झाले, कोल्हापुरी बंधाऱ्यांना मंजुरी देताना त्यांच्या अंदाजपत्रकात गेटच्या खर्चाचाही समावेश असताना जुन्या बंधाऱ्यांना गेट का बसवले नाहीत, जर गेट चोरी गेले असतील तर किती जणांवर गुन्हे दाखल केले आदी प्रश्‍न सदस्य किशोर बलांडे, अविनाश गलांडे, सय्यद सलीम, रमेश बोरनारे, विजय चव्हाण यांनी उपस्थित केले. यावर कार्यकारी अभियंता श्री. पवार यांनी काही गेट पुरात वाहून गेले, काही गंजले होते, तर काही चोरीला गेल्याचे सांगितले. 

भाजपचे शिवाजी पाथ्रीकर, एल. जी. गायकवाड आदींनी गेट बसवणे आवश्‍यक असून गेट बसवले नाही तर यंदाही बंधाऱ्यात पाणी अडणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र रुद्र कन्स्ट्रक्‍शनला निविदा मंजूर करण्याला शिवसेना, मनसे व काँग्रेस सदस्यांकडून होणाऱ्या विरोधामुळे तास दीड तासाच्या चर्चेनंतरही या बैठकीत हा ठराव मंजूर होऊ शकला नाही. तो दुरुस्तीसह पुढच्या सभेत ठेवण्याचे आदेश अध्यक्षा श्रीमती डोणगावकर यांनी दिले.

पिंपळवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात शवविच्छेदनाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सभागृहात सासू-सुनेची जोडी  
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सासू-सुनेची जोडी बरोबरीने सभेच्या कामकाजात सहभागी झाल्या. पैठणच्या सभापती गबाबाई चव्हाण या पंचायत समितीच्या प्रतिनिधी म्हणून सभेला हजर होत्या. याच सभेत आडूळ गटातून निवडून आलेल्या कविता चव्हाण यादेखील आल्या होत्या. कविता चव्हाण या सभापती गबाबाईच्या सूनबाई. या दोघी सासू-सुना शेजारी बसल्या होत्या.

जल आराखड्यावर आक्षेप
रमेश गायकवाड यांनी नुकताच शासनाने जाहीर केलेला जल आराखडा मराठवाड्यावर अन्यायकारक असल्याचा आक्षेप घेतला. या आराखड्यात दुरुस्ती करून मराठवाड्यावरील अन्याय दूर करावा, असा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवण्याची मागणी केली. त्यावर तसा ठरावही मंजूर करण्यात आला.

Web Title: aurangabad marathwada news Water will be transported from dam