जुन्या शहरात दोन दिवस निर्जळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

औरंगाबाद - रेल्वेस्टेशन रोडवर मंगळवारी (ता. २३) पहाटे ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. महापालिकेने हाती घेतलेले दुरुस्तीचे काम बुधवारी (ता. २४) पहाटेपर्यंत चालणार आहे. यामुळे जुन्या शहरात दोन दिवस निर्जळी राहणार आहे. 

जुन्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नक्षत्रवाडी येथून ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. त्यातून जुन्या शहरासह पहाडसिंगपुरा, भावसिंगपुरा, ज्युबलीपार्क, बेगमपुरा, शांतीपुरा, लक्ष्मी कॉलनी, विद्यापीठ परिसर या भागात पाणीपुरवठा केला जातो. मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अयोध्यानगर भागात या जलवाहिनीला मोठे भगदाड पडले. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी  रस्त्यावर आले. काही नागरिकांनी माहिती देताच अडीच वाजता या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे मंगळवारी दिवसभर जुन्या शहरातील वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. दरम्यान, जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असले तरी ते बुधवार पहाटेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित राहणार आहे. दरम्यान, रात्री दोन वाजेपूर्वी काही प्रमाणात पाण्याच्या टाक्‍या भरलेल्या होत्या, ते पाणी गुंठेवारी भागाला टॅंकरद्वारे पुरविण्यात आले. आगामी दोन दिवस बुधवार आणि गुरुवारी जुन्या शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

लागणार चोवीस तास
जलवाहिनीला मोठे भगदाड पडल्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. दुरुस्तीसाठी किमान चोवीस तासांचा वेळ लागणार आहे. बुधवारी पहाटेपर्यंत दुरुस्ती पूर्ण होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: aurangabad marathwada news waterline leakage