घुसमटणारा श्‍वास सावरण्यास हवा सामाजिक आधार

मनोज साखरे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

आत्महत्येची भयावहता - महाराष्ट्राचा पहिला क्रमांक, तरुणांची संख्या अधिक

औरंगाबाद - मानवी मनाची घुसमट दिवसेंदिवस वाढत आहे. यातून टोकाचा निर्णय घेणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. आत्महत्येचा एक निर्णय स्वत:सह कुटुंब उघड्यावर आणणारा ठरत असून, हा सामाजिक प्रश्‍न दिवसेंदिवस भयावह होत आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांना शाब्दिक आधार, कृतिशील दिलासा आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन संघर्षरत राहण्यासाठी मनोबाल वाढण्याकरिता मार्गदर्शन देणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

आत्महत्येची भयावहता - महाराष्ट्राचा पहिला क्रमांक, तरुणांची संख्या अधिक

औरंगाबाद - मानवी मनाची घुसमट दिवसेंदिवस वाढत आहे. यातून टोकाचा निर्णय घेणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. आत्महत्येचा एक निर्णय स्वत:सह कुटुंब उघड्यावर आणणारा ठरत असून, हा सामाजिक प्रश्‍न दिवसेंदिवस भयावह होत आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांना शाब्दिक आधार, कृतिशील दिलासा आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन संघर्षरत राहण्यासाठी मनोबाल वाढण्याकरिता मार्गदर्शन देणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंबाकडे कल वाढतो आहे. कुटुंब भरभक्कम आधार असतो, परंतु आपसातील वैमनस्य, वादविवाद यातून हा आधारही कोसळत आहे. जीवन जगण्याच्या पद्धतीतील कमालीच्या बदलांमुळे संवाद खुंटत आहे. त्यातून एकलकोंडेपणा, वैमनस्य, चिडचिड येते आणि व्यसनांच्या आहारी जाऊन माणूस खचून जातो. इंटरनेटद्वारे आत्महत्येचा मार्ग निवडला जातो. ही समस्या गंभीर असून ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेची आकडेवारी लक्षात घेतल्यास आत्महत्यांबाबत देशातील भयावह परिस्थिती समोर येते. या समस्येवर उपाय करण्याची गरज आहे.  

तरुणांबद्दल चिंता
देशात महाराष्ट्रात होणाऱ्या आत्महत्या सर्वाधिक असून, ही चिंतेची बाब आहे. विशेषतः कौटुंबिक वीण पक्की ठेवणे, एकमेकांमधील संवाद अधिकाधिक सुखद करणे आणि सहजीवनाला पूरक ठेवण्यावर भर दिला पाहिजे. स्पर्धेला तोंड देण्याची मनाची तयारी पाहिजे, त्या जोडीला नकारदेखील पचवायला शिकले पाहिजे. विशेषतः तरुण मुलांमध्ये विविध कारणांनी उतावीळपणा वाढत आहे. नकार ऐकण्याची त्यांची तयारी नसते, त्या मानसिकतेतून त्यांनी बाहेर पडले पाहिजे. आकडेवारीवर जरी नजर टाकली तरी, अठरा ते तीस वयोगटातील युवकांच्या आत्महत्येचे प्रमाण काळजी करण्याजोगे आहे. एकीकडे भारत हा तरुणांचा देश अशी गणना होत असतानाच या वर्गातील वाढते नैराश्‍य चिंतेत भर टाकणारे आहे. या वर्गाच्या आशा, आकांक्षांकडे लक्ष देणे, त्यांना सक्षम करतानाच जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी शिकवण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांना वाटते. 

ही आहेत आत्महत्येची कारणे 
कौटुंबिक समस्येतून निर्माण होणारे वाद, वैवाहिक समस्या, आजार, प्रेमप्रकरण, गरिबी, शेतीसमोरील संकटे, नापिकी, व्यसनाधीनता, मोबाईल आणि इंटरनेटचा अतिवापर, कर्जबाजारीपणा, शिक्षण, परीक्षेतील अपयश आणि बेरोजगारी इत्यादी.

आत्महत्येपूर्वीची लक्षणे
वर्तनात अचानक बदल होणे, अंतर्मुख होणे, घराबाहेर जास्त जाणे किंवा घरातच राहणे, एकांतात राहणे, अस्वस्थ असणे, सतत चिडचिड करणे, जेवण जास्त अथवा कमी करणे, झोप कमी अथवा जास्त घेणे, स्वत:ला दोष देणे, मरणाचा विचार व्यक्त करणे.

आत्महत्येची लक्षणे ओळखून अशा व्यक्तींशी बोलून कारणांचा शोध घ्यावा. जवळील व्यक्तींनी अशा व्यक्तींसोबत संवाद साधावा. समुपदेशकाकडे वेळीच नेऊन अशा व्यक्तीचे समुपदेशन करावे, हे उपाय करणे श्रेयस्कर आहेत. त्यामुळे आत्महत्या रोखली जाऊ शकते.
- डॉ. संदीप सिसोदे, समुपदेशक

देशातील आत्महत्या
वर्ष    आकडेवारी    टक्केवारी

 २०११    १,३५,५८५    ११.२ 
 २०१२    १,३५,४४५    ११.२ 
 २०१३    १,३४,७९९    ११.००
 २०१४    १,३१,६६६    १०.६
 २०१५    १,३३,६२३    १०.६

वयोगटानुसार २०१५ मध्ये झालेल्या आत्महत्या
    वय    पुरुष    स्त्रिया

 ६० पेक्षा अधिक    ७,६३२    २,७६१
 ४५ पेक्षा कमी    १,८९७    ५,४७९
 ३० पेक्षा कमी    ३२,६५४    ११,९३८
 १८ पेक्षा जास्त    २६,८८३    १६,९६४
 १४-१८ दरम्यान    ३,६७२    ४,२६८ 
 १४ पेक्षा कमी    ७९०    ६७८

महाराष्ट्र आत्महत्येत आघाडीवर

 महाराष्ट्र :     १६,९७०
 तमिळनाडू :     १५,७७७
 पश्‍चिम बंगाल :     १४,६०२
 कर्नाटक :      १०,७८६
 तेलंगणा :     १०,१४०
 केरळ :     ७,६९२
 गुजरात :     ७,२७६
 छत्तीसगड :     ७,१७८
 आंध्र प्रदेश :     ६,२२६
 राजस्थान :     ३,४५७

Web Title: aurangabad marathwada news World Suicide Prevention Day