शहराचे नवे महापौर भगवान घडामोडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

उपमहापौरपदावर स्मिता घोगरे यांची निवड

उपमहापौरपदावर स्मिता घोगरे यांची निवड
औरंगाबाद - महापालिकेच्या बुधवारी (ता.14) झालेल्या निवडणुकीत महापौरपदावर भाजपचे भगवान (बापू) घडामोडे यांची, तर उपमहापौरपदावर स्मिता घोगरे यांची बहुमताने निवड झाली. स्मिता घोगरे या अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत; मात्र नंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. दोघांनाही प्रत्येकी 71 मते मिळाली. महापौर घडामोडे यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी एमआयएमच्या सायराबानो अजमलखान यांच्यापेक्षा, तर उपमहापौर घोगरे यांनी एमआयएमच्या खान इर्शाद इब्राहीम यांच्यापेक्षा 46 मतांच्या फरकाने विजय मिळविला. तर दोन्ही पदांसाठी कॉंग्रेसच्या उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
महापालिकेत एकूण 115 नगरसेवक आहेत. यापैकी शिवसेनेचे 29, भाजपचे 23, एमआयएमचे 24, कॉंग्रेसचे 11, बहुजन समाज पार्टीचे 5, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4, रिपाइं (डेमोक्रॅटिक) चे 2, तर अपक्ष 17 असे पक्षीय बलाबल आहे. तर पाच स्वीकृत सदस्य आहेत. शिवसेनेच्या शीतल गादगे या अपात्र ठरल्यामुळे, तर अपक्ष नगरसेविका खतीजा बेगम कुरेशी या गैरहजर राहिल्यामुळे निवडणुकीसाठी एकूण 113 नगरसेवक उपस्थित होते.

पीठासीन अधिकारी म्हणून डॉ. निधी पांडेय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सभेला सकाळी 11 वाजता सुरवात झाली. सुरवातीला उपलब्ध उमेदवारांच्या नामांकनपत्रांची छाननी करण्यात आली. महापौरपदासाठी 3 उमेदवारांनी 7, तर उपमहापौरपदासाठी 3 उमेदवारांनी 5 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. उमेदवारी मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता, मात्र या वेळात कोणीही नामनिर्देशनपत्र मागे घेतले नाही. यामुळे मतदान घेण्यात आले. हात उंचावून सर्वांचे मतदान घेण्यात आले. आधी महापौरपदासाठी, तर नंतर उपमहापौर पदासाठी मतदान घेण्यात आले.

महापौर, उपमहापौर 46 मतांच्या फरकाने विजयी
वर्णानुक्रमे कॉंग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार अय्युब खान महंमद हुसेनखान यांना मतदान करण्यासाठी सदस्यांना हात उंचावण्यास सांगण्यात आले. कॉंग्रेसचे 11 सदस्य असताना मतदानाच्या वेळेपर्यंत कॉंग्रेसच्या नगरसेविका वैशाली जाधव सभागृहात दाखल न झाल्याने अय्युबखान यांना 10 मते मिळाली. यानंतर खान सायराबानो अजमलखान यांच्यासाठी हात वर करून मतदान करणाऱ्या सदस्यांची नोंद घेण्यात आली. एमआयएमचे 24 व एक एमआयएम समर्थक मिळून त्यांना 25 मते मळाली. युतीचे उमेदवार भगवान (बापू) देवीदास घडामोडे यांच्यासाठी मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या मोजण्यात आली. शिवसेनेचे 28, भाजपचे 23 , बसपाचे 4, रिपब्लिकन पार्टी ऑप इंडिया (डेमोक्रॅटिक)चे दोन आणि 14 अपक्ष सदस्यांनी बापू घडामोडे यांना मतदान केले. त्यांना 71 मते मिळाली. ही मते त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी एमआयएमच्या खान सायराबानो अजमलखान यांच्यापेक्षा 46 मतांनी जास्त होती. यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

उपमहापौर पदासाठी कॉंग्रेसचे अब्दुल महंमद नविद अब्दुल रशिद यांना 11, एमआयएमचे खान इर्शाद इब्राहीम यांना 25, तर युतीच्या स्मिता घोगरे यांना 71 मते मिळाल्याने उपमहापौर पदावर श्रीमती घोगरे यांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी जाहीर केले. पीठासन अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, नगरपालिका प्रशासन अधिकारी राठोड, नगरसचिव दिलीप सूर्यवंशी, उपायुक्‍त रवींद्र निकम यांनी सहकार्य केले.

Web Title: aurangabad mayor election