महापालिका बजेटमध्ये अर्धी हवाच!

माधव इतबारे
सोमवार, 8 जुलै 2019

केवळ घोषणांचा पाऊस 
दरवर्षी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला जातो. महापालिकेच्या तिजोरीत शासन अनुदानासह मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचे प्रमाण पाहिले असता विकासकामांसाठी २०० कोटींपेक्षाही कमी निधी शिल्लक राहतो. मात्र, अर्थसंकल्पात प्रशासन, पदाधिकारी दिवास्वप्न दाखवितात. दरवर्षी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्पाची चर्चा होते; मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा योजना, घनकचरा प्रकल्प, हरित औरंगाबाद, सिंचन, क्रीडा, सफारी पार्क, रस्त्यांची कामे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, अग्निशमन विभाग बळकटीकरण, शाळांचा दर्जा उंचावणे, आरोग्य सुविधा बळकट करणे अशा घोषणांचा पाऊसच पाडला आहे; मात्र वर्ष संपताच ही कामे कागदावरच राहतात. गेल्या पाच वर्षांत सर्वसाधारण सभेने अंतिम केलेल्या बजेटची आकडेवारी सहा हजार ६२ कोटी एवढी होते. तर प्रत्यक्षात (सुधारित अर्थसंकल्प) महापालिकेच्या तिजोरीत तीन हजार ५२३ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे अडीच हजार कोटींची कामे गायब झाली आहेत.

पाच वर्षांत तब्बल अडीच हजार कोटींची तूट
औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी जेमतेम सातशे ते आठशे कोटी रुपये जमा होतात. असे असताना यंदा आयुक्तांनीच तब्बल २०२० कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे. गतवर्षी प्रशासनाने १२४४ कोटींचा अर्थसंकल्प सादर  केला असताना स्थायी समिती, सर्वसाधारण सभेने त्यात वाढ करून बजेट १८६४ कोटी रुपयांवर नेले. प्रत्यक्षात वर्षभरात ८३१ कोटी रुपयेच तिजोरीत जमा झाले. तब्बल एक हजार कोटींची उत्पन्नात तूट असताना प्रशासनाने १२०० कोटी रुपयांची हवा बजेटमध्ये भरत विकासकामांचा केवळ भास निर्माण केला आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे अडीच हजार कोटींची कामे कागदावरच आहेत. 

महापालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांपासून खडखडाट आहे. कंत्राटदारांची देणी सुमारे अडीचशे कोटींवर गेल्यामुळे नव्या कामांवर त्यांनी बहिष्कार टाकला असून, प्रत्येक महिन्याला कोट्यवधी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध होत असताना त्या भरण्यासाठी एकही कंत्राटदार समोर येत नसल्याचे चित्र आहे. असे असताना दुसरीकडे बजेटच्या आकड्यांमध्ये प्रशासन, सत्ताधारी पदाधिकारी वर्षानुवर्षे हवा भरत आहेत. आर्थिक वर्ष संपल्यानंतर मात्र बजेटचा फुगा फुटत आहे. १९८६ मध्ये नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर पहिले बजेट केवळ ८० कोटी रुपयांचे होते. त्यानंतर गेल्या ३८ वर्षांत बजेटचा आकडा तब्बल २०२० कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून बजेट फुगविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

विशेष म्हणजे, प्रशासनसुद्धा त्यात मागे नाही. गतवर्षी प्रशासनाने १,२४४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असताना स्थायी समिती, सर्वसाधारण सभेने त्यात वाढ करून बजेट १,८६४ कोटी रुपयांवर नेले. प्रत्यक्षात वर्षभरात गतवर्षी ८३१ कोटी रुपयेच तिजोरीत जमा झाले. त्यामुळे तब्बल एक हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. असे असताना यंदा डॉ. निपुण विनायक यांनी वर्ष २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी तब्बल २०२०.५४ कोटी जमा, तर २०१९.७५ कोटी रुपये खर्च असे ४९ लाख रुपये शिलकीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवारी (ता.२८) स्थायी समितीला सादर केले आहे. दोन हजार कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत येणार कुठून? याचा हिशेब लावताना आकड्यांची फुगवाफुगवी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Budget