साक्षात परमेश्‍वरालाही महापालिका चालवणे कठीण !

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 10 मे 2018

व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल मालाणी म्हणाले, डिएमआयसी, पर्यटनाची राजधानी, स्मार्टसिटी, दीडशे मर्सिडिजचे हे शहर आपले घर समजून स्वच्छ ठेवावे. लायन्स क्‍लबचे नवल मालू म्हणाले, माझ्या वॉर्डात महापालिकेचे कर्मचारी व्यवस्थित काम करीत नाहीत.

औरंगाबाद : मला वाटले महापौर हे शोभेचे पद असून आता छान ऐटीत मिरवायचे. मात्र, कचरा प्रश्‍नाने माझ्या आनंदावर पाणी फेरले, अशा भावना व्यक्‍त करीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. नऊ) आपली कैफियत मांडली. तसेच वरतून परमेश्‍वर आला तरीही महापालिका चालविणे कठीण असल्याचेही बोलवून दाखविले. 

विभागीय आयुक्‍तालय आणि महापालिकेतर्फे बुधवारी (ता.९) तापडिया नाट्यमंदिर येथे महास्वच्छता अभियान बैठक घेण्यात आली.  यावेळी श्री. घोडेले यांनी कचरा प्रश्‍नाबाबत आपली भूमिका व्यक्‍त केली. ते म्हणाले, शहर स्वच्छ व सुंदर असायलाच हवे, ही आमचीही इच्छा आहे. मात्र, या कचरा प्रश्‍नामुळे इतर महत्वाचे असलेले प्रश्‍न बाजूला पडले आहेत. सकाळी दारासमोरून कचरा गाडी जात असताना त्यात कचरा टाकल्या जात नाही. मात्र, त्यानंतर रस्त्यावर कचरा टाकल्या जातो. हे थांबायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी या प्रश्‍नांचा मागोवा घेत समस्या आणि त्यावर शोधलेले उपाय उपस्थितांसमोर सादर केले. 

व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे यांनी कचरा प्रश्‍नांवरच बोट ठेवत हा प्रश्‍न वेळीच सुटायला हवा, त्यासाठी चांगले अधिकारी असायला हवे, अशा सूचना करीत प्रशासनाचे कान टोचले. 

व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल मालाणी म्हणाले, डिएमआयसी, पर्यटनाची राजधानी, स्मार्टसिटी, दीडशे मर्सिडिजचे हे शहर आपले घर समजून स्वच्छ ठेवावे. लायन्स क्‍लबचे नवल मालू म्हणाले, माझ्या वॉर्डात महापालिकेचे कर्मचारी व्यवस्थित काम करीत नाहीत. त्यामुळे महापौरांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अचानकपणे भेट द्यायला हवी. म्हणजे बऱ्याच बाबी समोर येऊ शकतील. यावेळी सहायक पोलिस आयुक्‍त सी. डी. शेवगण, आमदार अतुल सावे, नगररचना उपसंचालक रीता मैत्रेवार, शहर अभियंता एस. डी. पानझडे अशोक भालेराव, सारंग टाकळकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले. मंचावर उपमहापौर विजय औताडे, विकास जैन, गजानन बारवाल, मिलिंद पाटील उपस्थित होते.

Web Title: Aurangabad Municipal Corporation work