‘स्थायी’साठी इच्छुकांची फिल्डिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

यंदा सभापतिपद भाजपकडे
युतीच्या फॉम्युल्यानुसार तीन वर्षे सभापतिपद भाजपकडे आणि दोन वर्षे शिवसेनेकडे राहणार आहे. पहिल्यावर्षी सभापतिपदी भाजपचे दिलीप थोरात यांची वर्णी लागली. त्यानंतर शिवसेनेचे मोहन मेघावाले, शहर विकास आघाडीचे (भाजप पुरस्कृत) गजानन बारवाल, राजू वैद्य (शिवसेना) यांना संधी मिळाली. आगामी वर्षभरासाठी सभापतिपद भाजपकडे आहे. भाजपचे पूनम बमणे आणि जयश्री कुलकर्णी हे दोन सदस्य स्थायी समितीत आहेत. या दोघांपैकी किंवा नवीन निवड होणाऱ्या एका सदस्यांपैकी कोणाला संधी मिळणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

औरंगाबाद - महापालिका निवडणुकीसाठी वर्षभराचा कालावधी असून, यंदाचे स्थायी समिती सभापती विद्यमान नगरसेवकांसाठी शेवटचे राहणार आहे. त्यामुळे महापालिकेतील स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ‘स्थायी’तून निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागेवर नवे सदस्य निवडण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिकेची स्थायी समिती ‘अर्थ’पूर्ण समिती आहे. त्यामुळे ‘स्थायी’च्या १६ जणांमध्ये वर्णी लावण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये चुरस असते. एक एप्रिलला ‘स्थायी’मध्ये दोन वर्षे पूर्ण झालेले आठ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. ही निवड त्या-त्या पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार केली जाते. सदस्यांची निवड करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 रिक्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये पाच सदस्य शिवसेनेचे, दोन सदस्य एमआयएमचे तर एक सदस्य भाजपच्या कोट्यातील आहेत. विद्यमान सभापती राजू वैद्य यांच्यासह ऋषिकेश खैरे, सिद्धांत शिरसाट, रूपचंद वाघमारे, स्वाती नागरे (शिवसेना), सय्यद मतीन, शेख नर्गीस सलीम (एमआयएम), राखी देसरडा (भाजप) यांचा समावेश आहे. यासोबत महिला व बालकल्याण समिती, वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समिती, शहर सुधार समिती, माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती, गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाजकल्याण या पाच समिती सदस्यांचीही निवड होणार आहे. प्रत्येक समितीत नऊ सदस्यांची निवडही उद्याच होणार आहे.

Web Title: Aurangabad Municipal Standing Committee Selection Politics