'औरंगाबाद- नगर- शिरूरचे रस्त्याचे केंद्राकडे हस्तांतरण कधी'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

- बायबॅक शिवाय रस्ते विकास मंत्रालयाकडे कारभार नाहीच 
- टोल नाके बंद करूनच प्रक्रिया

औरंगाबाद : पुणे शिरूर या 55 किमी रस्त्याचे हस्तांतरण केंद्राकडे झाले आणि त्याच्या विस्ताराचा आराखडाही बनू लागला आहे. पण या रस्त्याचा पुढचा भाग असलेल्या शिरूर- नगर- औरंगाबाद या दीडशे किलोमीटर रस्त्याचे केंद्राकडे हस्तांतरण कधी होणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

औरंगाबाद पुणे दरम्यान वाढलेल्या रहदारीचा मार्ग सुकर करण्यासाठी पुणे शहरापासून शिरूर पर्यंतचा 55 किलोमीटरचा रस्ता राज्य सरकारने केंद्राकडे हस्तांतरित करून टाकला आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या या कारवाईनंतर आता यासाठी सल्लागार नेमून या 55 किमी रस्त्याच्या रुंदीकरण, विस्तारीकरण आणि स्थानिक वाहनांसाठी वेगळा मार्ग काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यात नवीन सर्व्हिस रोड आणि भूमिगत वळण रस्ते आदी सुविधांच्या निर्मितीसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणतर्फे हाती घेण्यात आले आहे.

मात्र शिरूर-नगर आणि औरंगाबाद या शहरांना जोडणारा दीडशे किलोमीटरच्या रस्त्याचे हस्तांतरण केंद्राकडे करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे एकही पाऊल पुढे टाकण्यात आलेले नाही. या रस्त्यावर असलेल्या गावांची लोकवस्ती आज रस्त्यालगत वाढत असल्याने भविष्यात अपघातांच्या संख्येत वाढ होऊ शकते. याला आळा घळण्यासाठी केंद्राच्या नियमांना धरून नव्याने या महामार्गाची निर्मिती अपेक्षित असताना गेल्या चार वर्षात यावर कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नाही. 

टोल नाक्‍यांचा मुख्य अडसर
या मार्गावर असलेल्या दोन टोल नाक्‍यांचा मुख्य अडसर या रस्त्याच्या हस्तांतरणात आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे कोणताही रस्ता टोल नाक्‍यासह हस्तांतरित करून घेतली जात नाही. त्यामुळे या दोन नाक्‍यांच्या उर्वरित वसुलीचा आकडा अदा केला जात नाही, तोवर हे हस्तांतरण होणार नाही आणि ही वाट विकासीताही होणार नाही. 

शिरूर पुणे रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. शिरूर ते औरंगाबाद रस्त्याचे हस्तांतरण करण्यासाठी अद्याप प्रस्ताव आलेला नाही. - प्रफुल्ल दिवाण (प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण)

Web Title: Aurangabad Nagar Shiroor road Issue when transfer to central