शंभर कोटीच्या रस्त्यांचे  मुंबईत पॅचअप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - शंभर कोटी रुपयांच्या यादीवरून सुरू असलेल्या वादावर अखेर मुंबईत मंगळवारी (ता. २९) पॅचअप करण्यात आले आहे. स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी माघार घेतली असून, तक्रार करण्याऐवजी त्यांनी महापौरांसह मुख्यमंत्र्याची भेट घेतली.

औरंगाबाद - शंभर कोटी रुपयांच्या यादीवरून सुरू असलेल्या वादावर अखेर मुंबईत मंगळवारी (ता. २९) पॅचअप करण्यात आले आहे. स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी माघार घेतली असून, तक्रार करण्याऐवजी त्यांनी महापौरांसह मुख्यमंत्र्याची भेट घेतली.

शहरातील रस्त्यांसाठी शासनाने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र या निधीतून नेमके कोणते रस्ते करायचे यावरून गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरू होता. शासनाने शंभर कोटींचा निधी दिलेला असताना प्रशासनाने दीडशे कोटींची यादी तयार केली. त्यानंतर शंभर कोटींचे ३१ रस्ते अंतिम करण्यात आले व १९ रस्त्यांना कात्री लावण्यात आली. अंतिम यादी समोर आल्यानंतर नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी या यादीत सध्या चांगल्या अवस्थेत असलेल्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला असून, ही वादग्रस्त यादी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सभापती बारवाल यांनीही यादीवर आक्षेप घेत याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची भूमिका घेतली. 

दरम्यान, श्री. बारवाल हे सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली; मात्र ती महापौर भगवान घडामोडे, माजी महापौर भागवत कराड यांच्यासोबत. मुख्यमंत्री मुंबईतील पावसामुळे घाईत होते, त्यामुळे त्यांना निवेदन देता आले नाही, असे श्री. बारवाल यांनी सांगितले. 

सभापतींपाठोपाठ महापौरही दाखल 
स्थायी समिती सभापती गजानन बारवाल रस्त्यांच्या चुकीच्या यादीबाबात तक्रार करण्यासाठी सोमवारी मुंबईला रवाना झाले होते. मात्र सोमवारी त्यांची व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर मंगळवारी महापौर भगवान घडामोडे, माजी महापौर भागवत कराड यांच्यासह मुंबईत दाखल झाले. त्यानंतर मात्र श्री. बारवाल मवाळ झाले.

महापौर परिषदेसाठी येणार मुख्यमंत्री 
शहरात अखिल भारतीय महापौर परिषदेचे ९ व १० सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी महापौरांनी मुख्यमंत्र्याची भेट घेत परिषदेचे निमंत्रण दिले. त्यानुसार परिषदेसाठी येण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती श्री. बारवाल यांनी दिली.

Web Title: aurangabad new road