बारा हजार नवीन वीज जोडण्या प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

औरंगाबाद - वीज चोरीला आळा बसवा, नियमितपणे सर्वांना वीज मिळावी यासाठी ‘महावितरण आपल्या दारी’ योजना सुरू करण्यात आली; मात्र या योजनेला शासनाचे पाठबळ मिळत नसल्यामुळे ही योजना केवळ कागदावरच राहिली आहे. २०१५ पासून योजनेसाठी अर्ज केलेल्यांना अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. यामुळे औरंगाबाद परिमंडळात बारा हजारांहून अधिक ग्राहक नवीन जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. 

घरगुती आणि शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत औरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये नवीन लाईन टाकून शेतकऱ्यांना वीज देण्याचे काम होते; मात्र या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्‍यकता आहे. महावितरणकडे निधी नसल्यामुळे २०१५ पासून आतापर्यंतच्या ग्राहकांना नव्याने जोडणी मिळालेली नाही. या विषयी शेतकरी, तसेच लोकप्रतिनिधींनी आवाज उठविल्यानंतर २०१२ पूर्वी योजनेच्या माध्यामातून नवीन जोडणीसाठी अर्ज केलेल्यांना जोडणी देण्याचे काम सुरू आहे. इन्फ्रा आणि आयपीडीएस योजनेअंतर्गत या योजनेसाठी निधी उपलब्ध करून या जोडण्या देण्यासाठी तडजोड करावी लागत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली.
परिमंडळात जे काम करण्यात येत आहे. त्यातही ठेकेदाराची मनमानी सुरू असल्यामुळे दिलेल्या वेळेत कामे पूर्ण होत नाहीत. यातील काही ठेकेदार या कामासाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारीही जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत आल्या होत्या; मात्र त्या ठेकेदारांवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

बारा कोटी रुपयांची गरज
‘महावितरण आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वांना वीज हे ध्येय ठेवून राबविण्यात येत आहे; मात्र निधी आणि ठेकेदारांच्या मनमानी काराभारामुळे ही योजना अर्जदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. योजेनच्या पूर्णपणे परिपूर्तीसाठी १० ते १२ कोटी रुपयांची गरज असून हा निधी मिळाल्यावर बारा हजार ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी मिळले. योजनेसाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad news 12000 new electricity connection pending