सूतगिरणी चौकाजवळ घसरले १६ दुचाकीस्वार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

औरंगाबाद - माती साचलेल्या रस्त्यावर पावसामुळे चिखल होऊन एक, दोन नव्हे, तर तब्बल १६ दुचाकी घसरल्याची घटना गुरुवारी (ता. १२) सायंकाळी सूतगिरणी चौक ते जवाहर कॉलनी रस्त्यावर घडली. अग्निशमनच्या बंबांनी पाण्याचे फवारे मारून रस्ता अक्षरशः धुवून काढल्यावर पुन्हा वाहतूक सुरळीत झाली.

औरंगाबाद - माती साचलेल्या रस्त्यावर पावसामुळे चिखल होऊन एक, दोन नव्हे, तर तब्बल १६ दुचाकी घसरल्याची घटना गुरुवारी (ता. १२) सायंकाळी सूतगिरणी चौक ते जवाहर कॉलनी रस्त्यावर घडली. अग्निशमनच्या बंबांनी पाण्याचे फवारे मारून रस्ता अक्षरशः धुवून काढल्यावर पुन्हा वाहतूक सुरळीत झाली.

थोड्याफार पावसामुळेही शहरातील रस्त्यांवरचे सगळे खड्डे ओव्हरफ्लो झाले आहेत. मात्र खड्डे नसलेल्या रस्त्यांवर नागरिकांची फजिती कशी करायची, असा विचार कदाचित झाला आणि गुळगुळीत काँक्रिट रोडवरही माती जमा होऊ लागली! वेळेवर ती उचलण्याचे कष्ट कोण घेणार? त्यामुळे काय नवा प्रकार घडू शकतो, ते गुरुवारी सायंकाळी सूतगिरणी चौकात बघायला मिळाले. 

पावसाची थोडीशी रिपरिप होऊन गेली होती. रस्ते पुरेसे ओले झाले होते. सिग्नलच्या चौकातील खड्डे चुकवून गजानन महाराज मंदिराच्या दिशेने निघालेल्या दुचाकी थोड्या पुढे येताच एकापाठोपाठ एक घसरू लागल्या. पाऊण तासात तब्बल १६ दुचाकीस्वार पडले. यात बहुतांश मोपेडधारक महिला होत्या. चौकातून मोठ्या वाहनांच्या चाकांना चिकटून येणारा चिखल काँक्रिट रस्त्यावर चिकटला होता. त्यामुळे चोपड्या झालेल्या रस्त्यावर या गाड्यांची चाके सरकून अपघात घडत होते.

दगड लावून वळवली वाहतूक
वारंवार घडणारे अपघात पाहून काही नागरिक सरसावले. त्यांनी दगड लावून वाहतूक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वळवली. तोपर्यंत नागरिकांपैकी स्वप्नील मंकावार, सौरभ कांबळे, दिनेश असरानी, संकेत जोशी यांनी इतर मित्रांसह रस्त्यावर थांबून वाहनधारकांना मार्गदर्शन केले. 

रस्ता काढला धुऊन
कुणी तरी नगरसेविका पतीला फोन केला. त्यांनी महापालिकेला कळवले. वॉर्ड अधिकारी आर. पी. वाघमारे, अभियंता विजय गोरे, पर्यवेक्षक डी. डी. जोंधळे यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. अग्निशमन विभागाचा बंब मागविण्यात आला. जवानांनी पाण्याचा जोरदार फवारा मारून रस्ता धुऊन काढला. नंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. 

Web Title: aurangabad news 16 bikers Slipped down