सहाशे वर्षांच्या रावणहत्था परंपरेचा आविष्कार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

डॉ. मुकुंद लथ यांचा आज सन्मान 
प्रसिद्ध संगीतज्ञ आणि संस्कृत विद्वान, पद्मश्री डॉ. मुकुंद लथ यांना रविवारी (ता. 21) यंदाच्या "शारंगदेव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक सन्मानप्राप्त डॉ. लथ हे भारतीय संगीत, नृत्य, सौंदर्यशास्त्र आणि संस्कृतीवरील लेखनासाठी नावाजलेले विद्वान आहेत.

औरंगाबाद - "महागामी गुरुकुल'तर्फे घेतल्या जाणाऱ्या नवव्या चारदिवसीय "शारंगदेव समारोहा'त दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. 20) मलेशियन कलाकार रामली इब्राहिम यांचे ओडिसी नृत्य आणि राजस्थानातील सुगनाराम यांच्या समूहाने सहाशे वर्षांची परंपरा असलेल्या "रावणहत्था'चे सादरीकरण केले. 

तेराव्या शतकातील महान संगीतज्ञ शारंगदेव यांच्या नावाने गेली आठ वर्षे हा महोत्सव घेतला जात आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात महागामीच्या शारंगदेव सभागृहात "मार्ग नाट्य' या विषयावर पियाल भट्टाचार्य यांचे सप्रयोग व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या शिष्यांसह मार्ग नाट्यपरंपरेच्या प्रस्तुती, स्वरप्रयोग, अनेक प्रकार आणि प्रयोजन, अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच "कर्नाटकातील शिल्पांमधील गौडली नृत्य व लास्यांग' यावर डॉ. करुणा विजयेंद्र यांनी सचित्र सादरीकरण करत मार्गदर्शन केले. 

"एमजीएम'च्या रुक्‍मिणी सभागृहात सायंकाळी दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात मलेशियाच्या क्वालालंपूर येथील गुरू देवप्रसाद दास परंपरेतील कलाकार रामली इब्राहिम यांचे ओडिसी नृत्याचे सादरीकरण झाले. त्यांनी प्रथम अभंग तरंग हे मंगलाचरण शंकराला समर्पित केले. त्यानंतर नवरसांची अनुभूती दिली. शिवाच्या आठ रूपांचे दर्शन घडवणाऱ्या "अष्ट शंभू' या रचनेने सांगता केली. त्यानंतर राजस्थानच्या सुगनाराम आणि समूहाने "झुमको ः रावणहत्था'चे सादरीकरण केले. 

रविवारी (ता. 21) तेलंगणामधील दर्शनम्‌ मोहुलैया यांचे "किन्नरी वीणा' वादन आणि पार्वती दत्ता यांचे "धृपदांगी कथ्थक' झाल्यावर पं. सत्यशील देशपांडे खयाल सादर करणार आहेत. सकाळच्या सत्रात "किन्नरी वीणा' या वाद्यपरंपरेविषयी बनारस-सेनिया घराण्याच्या संगीतज्ञ डॉ. इंद्राणी चक्रवर्ती, गुरू देवप्रसाद दासांच्या उडिसी वारशावर रामली इब्राहिम आणि "रावणहत्थाची हजार वर्षे' यावर डॉ. सुनीरा कासलीवाल-व्यास व्याख्यान देतील. कलारसिक, तज्ज्ञ, अभ्यासकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन "महागामी'च्या संचालिका पार्वती दत्ता यांनी केले आहे. 

Web Title: aurangabad news