वेदांमुळे थांबतील अन्याय अत्याचारः सत्यपालसिंह

अतुल पाटील
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

अखिल भारतीय वैदिक संमेलनाचे उद्‌घाटन

औरंगाबाद: शाळा, महाविद्यालय, महिलांना वेदांचे शिक्षण दिले पाहिजे. वेद शिकल्यानंतर समाजातील अन्याय, अत्याचार थांबतील, असे वक्‍तव्य पुण्याचे माजी पोलिस आयुक्‍त तथा केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी केले.

अखिल भारतीय वैदिक संमेलनाचे उद्‌घाटन

औरंगाबाद: शाळा, महाविद्यालय, महिलांना वेदांचे शिक्षण दिले पाहिजे. वेद शिकल्यानंतर समाजातील अन्याय, अत्याचार थांबतील, असे वक्‍तव्य पुण्याचे माजी पोलिस आयुक्‍त तथा केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी केले.

अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. सिंह बोलत होते. सिडकोतील जगत्‌गुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आज (शुक्रवार) हा कार्यक्रम झाला. यावेळी करवीर पीठाचे जगत्‌गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह, स्वागताध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे, महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव आदींची उपस्थिती होती.

डॉ. सिंग म्हणाले, "देशातील सर्व समस्या सोडवण्यासाठी वेदशास्त्रानुसार चालणे महत्वाचे आहे. संस्कृत शिकला तर, कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकता. जेवढी सुर्याची आणि समुद्राची किंमत आहे तेवढी वेदांची आहे. चारही वेदात कुठेही हिंदू शब्द लिहिलेला नाही, त्यामुळे वेद मानवतेसाठीच आहेत. जगाच्या उत्पत्तीसोबत वेदांची निर्मिती झाली आहे. वेदात सृष्टीचे विज्ञान आहे. जगाचे ज्ञान त्यातच सामावले आहे.''

"वेदामधील सत्यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. दुसऱ्या धर्मग्रंथाचे मुळ हे वेदच आहे. वेद असाधारण असून त्याच्या बरोबरीचे ना त्यापेक्षा श्रेष्ठ काही आहे. वेदांची प्रतिष्ठा होणार नाही, तोपर्यंत देशाच्या संस्कृतीची प्रतिष्ठा वाढणार नाही. सद्धस्थितीत ब्राह्मणांच्या घरातही अशी मुले नाहीत, ज्यांना चार वेदांची नावे माहित आहेत. त्यामुळे गावागावात जाऊन वेदांची माहिती दिली पाहिजे. तर व्यक्‍तिगत जीवनमान उंचावू शकतील. वेदांचा गर्व बाळगावा. स्वत:ला वाचवायचे असेल तर, वेदांचा प्रचार केला पाहिजे, असेही डॉ. सिंग म्हणाले.

शंकराचार्य विद्यानृसिंह म्हणाले, सगळ्यांनी वेद पठण करुन जतन केले पाहिजे. हे एका जन्माचे काम नाही. स्वत:ची मालकी काढून दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याला दान म्हणतात. यात देणारे घेणारे आनंदी पाहिजेत. वेदाचा योग्य अर्थ जाणून घेण्याचे काम संत तुकोबारायांनी केले. वेद विश्‍वाची जननी असून ते जतन करणाऱ्यांनाही समाजाने सांभाळले पाहिजे. यावेळी रविंद्र मुळे, अनिल भालेराव, दुर्गादास मुळे, संजय जोशी आदींची उपस्थिती होती.

डार्विनचा सिध्दांत चुकीचा
माणूस आधी माकड होता आणि मग तो माणूस झाला याचा वेद किंवा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. 35 वर्षांच्या वैज्ञानिकांच्या संशोधनाने देखील माणूस पुर्वीपासून माणूसच होता हे सिध्द झाले आहे. त्यामुळे डार्विनचा सिंध्दात चूकीचा असून शाळा, महाविद्यालयांमधून तो शिकवणे बंद केला पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ. सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: aurangabad news akhil bhartiya vaidik sammelan Inauguration satyapalsingh