दहा मिनिटांत बिलाची लेखी हमी,कंत्राटदार म्हणाला, ‘स्मार्ट महापालिका’ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

औरंगाबाद - महापालिकेत कामांच्या फायली वर्षानुवर्षे थकल्याचे प्रकार वारंवार समोर येतात; मात्र स्मार्ट सिटीची कामे करणाऱ्या महापालिकेचे प्रशासनदेखील स्मार्ट झाले असून, गुरुवारी (ता. १८) एका कंत्राटदाराला कामाचे बिल देण्याची हमी आयुक्तांच्या आदेशानंतर अवघ्या दहा मिनिटांत मिळाली. त्यामुळे कंत्राटदाराच्या तोंडूनदेखील ‘स्मार्ट महापालिका’ असे उद्‌गार बाहेर पडले. 

आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे शहरात केलेल्या कामांची बिले काढताना कंत्राटदारांना वर्षानुवर्षे महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागतात, अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक कंत्राटदार महापालिकेत काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने सोलर पॅनेल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक दोनच्या छतावर ५३ लाख रुपये खर्च करून हे काम केले जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात आले; मात्र आपले बिल कसे मिळणार याबाबत साशंक असलेल्या कंत्राटदाराने गुरुवारी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची भेट घेतली. त्यांनी बिलाची हमी द्या, काम सुरू करतो, असे सांगितले. आयुक्तांनी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना फोन करून तशी हमी कंत्राटदारांना देऊन टाका, अशा सूचना केल्या. तेव्हा सिकंदर अली आयुक्तांच्या दालनात शेजारीच बसलेले होते. कंत्राटदाराने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने एका कोऱ्या कागदावर स्मार्ट सिटीतून हे बिल देण्यात येईल, अशी लेखी हमी दिली. दहा मिनिटांतच कंत्राटदार पुन्हा आयुक्तांकडे आले व ‘स्मार्ट महापालिका’ असे उद्‌गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले.

आठवडाभरात काम सुरू 
स्मार्ट सिटी प्रकल्पातील हे पहिलेच काम आहे. त्यामुळे २६ जानेवारीला या कामाचा नारळ फोडण्यात येणार आहे. तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, त्यातून मिळणाऱ्या विजेवर संपूर्ण कार्यालय चालणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.

Web Title: aurangabad news amc