शंभर रुपयांची डस्टबिन घेतली 165 रुपयांना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

औरंगाबाद - महापालिका अधिकाऱ्यांची खाबूगिरी मंगळवारी (ता. 27) महापौरांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उघड झाली. बाजारात 100 रुपयांमध्ये भेटणारे डस्टबिन चक्क महापालिका अधिकाऱ्यांनी 165 रुपयांमध्ये खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र दरामधील फरक समोर येताच महापौरांनी संभाव्य खरेदी रद्द करून निविदा पद्धतीने बाजारातून डस्टबिन खरेदीचा निर्णय घेतला. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी दहा कोटींचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून रिक्षा, डस्टबिन खरेदी करण्यात येणार आहेत. शासनाच्या जे. एम. पोर्टलची खरेदीसाठी मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पोर्टलवर उपलब्ध कंपन्यांच्या दरांची पडताळणी केली. 12 लिटरचे डस्टबिन 166 रुपयांमध्ये दर्शविण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्यानुसार खरेदी प्रक्रिया सुरू केली; मात्र बाजारात काय भाव आहेत याची चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. मंगळवारी महापौरांनी डस्टबिन खरेदीचा आढावा घेतला. तेव्हा अधिकाऱ्यांनी भावाची माहिती दिली. महापौरांनी एका खासगी विक्रेत्याला बैठकीत बोलावून घेतले. हा विक्रेता डस्टबिन घेऊन बैठकीत आला. महापौरांनी डस्टबिन दाखविताना सांगितले, की 17 लिटरच्या उच्च दर्जाचे डस्टबिन बाजारात 100 रुपयांमध्ये मिळत आहे. मोठ्या संख्येने खरेदी केल्यास दर आणखी कमी होऊ शकतात. महापालिका चढ्या भावाने का घेत आहे? त्यानंतर अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. बाजारातील स्वस्त दरातील डस्टबिन निविदा पद्धतीने खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले. 

वाहने खरेदीची घाई 
यांत्रिकी विभागाने शहरातील कचरा उचलण्यासाठी हूक लोडर व इतर वाहने खरेदीसाठी कारवाई सुरू केली आहे. साडेतीन कोटी रुपयांची ही सर्व खरेदी असून, राज्य शासनाने दोन आठवड्यांपूर्वीच घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेला 86 कोटी रुपये देण्याचे मान्य केले. यामध्येही वाहने खरेदीसाठी रक्कम आहे. असे असताना साडेतीन कोटी रुपयांची खरेदी कशासाठी? असा जाब महापौरांनी विचारला. 

Web Title: aurangabad news amc dustbin issue